Sun, Jan 20, 2019 20:46होमपेज › Marathwada › हुंड्याच्या मागणीवरून न्यायाधीशावर गुन्हा दाखल

हुंड्याच्या मागणीवरून न्यायाधीशावर गुन्हा दाखल

Published On: Mar 12 2018 4:46PM | Last Updated: Mar 12 2018 4:53PMवसमत : प्रतिनिधी

वसमत शहरातील नव्याने न्यायाधिश झालेल्या वराने सासरच्या मंडळीस हुंड्यासाठी नगदी 15 लाख रूपये, 20 तोळे सोने तसेच इनोव्हा गाडीची मागणी  केली. ही मागणी पूर्ण न केल्‍यास लग्‍न न करण्याचे या वराकडून सांगितले गेल्‍याने, मुलीकडच्या मंडळींकडून या विरोधात शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्‍यामुळे न्यायाधीशावर  गुन्हा दाखल झाला आहे. 

वसमत शहरातील दर्गा मोहल्‍ला भागात राहणारे फिर्यादी शेख साबेर शे.इब्राहिम यांच्या मुलीचा साखरपुडा रितीरिवाजाप्रमाणे दि.21 सप्टेंबर 2017 रोजी न्यायाधिश शेख फयोजोद्दीन शेख खाजा मोईनोद्दीन यांच्या सोबत झाला होता. तेव्हा तीन लाख रूपये इतका खर्च आला होता. मात्र यानंतर हा मुलगा न्यायाधिशाची परीक्षा उत्तीर्ण होताच त्‍याच्याकडून इनोव्हा गाडी, 15 लाख रूपये नगदी व 20 तोळे सोने याची मागणी करण्यात आली. तसेच याची पुर्तता केल्‍याशिवाय लग्‍न करणार नाही असे या मुलाकडून सांगण्यात आले. मुलाकडून गत सहा महिन्यांपासून लग्‍नास टाळाटाळ होत असल्याने दि.10 मार्च रोजी मुलीच्या वडीलांनी मुलाच्या घरी जावुन लग्‍नाबद्दल विचारले असता, मुलाकडच्यांनी  हुज्जत घालत तुमच्याने काय होते ते करा अशी धमकी दिली. त्‍यामुळे वसमत शहर पोलिस ठाण्यात दि.12 मार्च रोजी शे.साबेर यांनी फिर्याद दिल्यावरून नुकताच न्यायाधिश परीक्षा उत्‍तीर्ण झालेले शेख फयोजोद्दीन, त्याचा भाऊ शेख आयाजोद्दीन या दोघांविरूद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणाचा तपास सपोनि शे.आजम हे करीत आहे.