Mon, Apr 22, 2019 21:47होमपेज › Marathwada › गुप्‍तधन काढणार्‍या टोळीवर छापा

गुप्‍तधन काढणार्‍या टोळीवर छापा

Published On: Aug 25 2018 4:33PM | Last Updated: Aug 25 2018 4:33PMवसमत : प्रतिनिधी

वसमत तालुक्यातल कुरूंदा भागात असलेल्या टोकाई देवी परिसरात शुक्रवारी (दि.24) मध्यरात्रीच्या सुमारास जादुटोणा करुन गुप्तधन काढणार्‍या टोळीवर कुरुंदा पोलिसांनी छापा मारला. यावेळी एकास पकडण्यात पोलिसांना यश आले तर अन्य तीन जण फरार झाले आहेत. या प्रकरणी कुरूंदा पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत तालुक्यात अनेक ठिकाणी जादुटोणा करुन गुप्तधन काढण्यात येत असल्याच्या चर्चा नेहमीच ऐकावयास मिळतात. यातच कुरुंदा भागातील टोकाई देवी मंदिर परिसरात शुक्रवारी (दि.24) मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी गंगाराम वाठोरे (वय 60 वर्ष) रा.मनाठा ता.हदगाव जि.नांदेड ह.मु.रुपुर ता.कळमनुरी, पिंपरे रा.रामवाडी ता.कळमनुरी, अप्पा रा. शिरडशहापूर तर अन्य एक असे एकुण चौघांनी संगणमत करुन आर्थिक लोभापाई जादुटोणा करुन गुप्तधन शोधण्यासाठी खड्ड्याचे खोदकाम सुरू केले होते. याच दरम्यान, कुरुंदा पोलिस रात्री पेट्रोलिंग करत असतांना त्‍यांना टोकाई देवी परिसरात काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी छापा मारला असता, हळद, कुंकू, तांदळाच्या पुड्या व लिंबु असे साहित्य व आरोपी गंगाराम वाठोरे यास ताब्यात घेण्यात आले. तर अन्य तीन जण फरार झाले. पोलिसांनी केलेल्या चौकशी अंती पकडलेल्या आरोपीकडून गुप्त धन काढण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी जमादार आनंदा वाळके यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरूध्द कुरूंदा पोलिस ठाण्यात नरबळी आणि इतर अनिष्ट अमानुष व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वसमत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्रसिंग धुन्‍ने हे करित आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशिद, वसमत शहर पोलिस ठाण्याचे पोनि आर.आर.धुन्‍ने आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

सदर घटनेतील एका आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. तर अन्य तिघे जण अद्यापपर्यंत फरार असून, त्यांचाही लवकरच छडा लावून ताब्यात घेणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे कुरूंदा परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर अनेकांनी घटनास्थळी जावून, खोदकाम केलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.