Fri, Apr 26, 2019 19:44होमपेज › Marathwada › बहरलेल्या पिकांना पावसाची प्रतीक्षा

बहरलेल्या पिकांना पावसाची प्रतीक्षा

Published On: Jul 27 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 1:33AMगेवराई : विनोद नरसाळे

तालुक्यात यावर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहाने  पेरणी केली. आता ही खरिपाची पिके चांगलीच जोमात आली आहेत, मात्र ढग, वारा रोजच गुंगारा देत असल्याने पाऊस गायब झाला आहे.  परिणामी पिकांचीही वाढ खुंटण्याबरोबरच उत्पादनात देखील मोठी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. सध्या या बहरलेल्या पिकांबरोबरच शेतकर्‍यांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

गेवराई तालुक्यात प्रमुख पीक म्हणून कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तालुक्यात यावर्षी जूनच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दुसर्‍या आठवड्यातच शेतकर्‍यांनी कपाशी लागवडीची लगबग करून लागवडी पूर्ण केल्या होत्या. तालुक्यातील कोळगाव, शिरसमार्ग, जातेगाव, पाचेगाव, गढी, सिंदखेड, तलवाडा, पाडळसिंगी, मादळमोही, हिरापूर, तांदळा, सुशी, वडगाव, तांदळा आदी परिसरातील यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने मृग नक्षत्रातच कपाशीची लागवड झालेली आहे. पाऊसाने मध्यांतरी मोठी दडी मारली होती, मात्र पिके तग धरुन राहिली. दरम्यान मागील दहा दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसाने ही पिके चांगलीच बहरली आहेत. मात्र पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने शेतकर्‍यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून दररोज आभाळ येत आहे. पाऊस पडत नसल्याने कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यामुळे शेतकर्‍यांना आता फवारणी करावी लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या खर्चातही वाढ झाली आहे. जोरदार पाऊस आल्यास कपाशीवरील रोग निघून जाईल, असे शेतकरी सांगतात.