Mon, Aug 19, 2019 09:05होमपेज › Marathwada › ऐंशी हजार क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत

ऐंशी हजार क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:36PMबीड : प्रतिनिधी

बीड जिल्ह्यासह राज्यातील सुमारे 34 जिल्ह्यांतील सर्व शासकीय तूर खरेदी केंद्रे 19 एप्रिल पासून बंद केले आहेत. जो पर्यंत शासनाचा नवीन आदेश येत नाही तो पर्यंत केंद्र सुरू होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे घरात  पोत्यांची थप्पी मारून ठेवलेली तूर शासन घेतेय की नाही या काळजीने शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे.

राज्य सरकारने या वर्षी देखील नाफेड मार्फत तूर खरेदी करण्याचे धोरण आखले होते, मात्र संबंधित यंत्रनेला योग्य नियोजन करता आले नाही.  शासनाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंद करूनही वेळेवर तुरीचे मापे करता आले नाही. अर्ध्या शेतकर्‍यांच्या हजारो क्वींटल तुरीचे मापे झाले नाहीत. अनेक शेतकर्‍यांच्या घरातच तुरीच्या पोत्यांची थप्पी  आहेत. 34 जिल्ह्यांत शासनाच्या वतीने तूर खरेदी केंद्रावर खरेदी यावर्षी सुरू होती. या सर्व जिल्ह्यापैकी बीड जिल्ह्यातील तूर सर्वात जास्त प्रमाणात शिल्लक राहिली आहे.

बीड जिल्ह्यातील चौदा तूर खरेदी केंद्रावर यावर्षी एक फेब्रुवारी ते अठरा एप्रिल दरम्यान 16925 शेतकर्‍यांच्या 168544 क्वींटल तुरीचे मापे होऊ शकली. अजूनही   जिल्ह्यातील दहा ते बारा हजार शेतकर्‍यांच्या जवळपास ऐशी ते पंच्याऐशी हजार क्विंटल तुरीचे मापे होणे बाकी आहे. शासनाच्या वतीने नवीन आदेश आल्यानंतर काय करायचे ते बघू असे जिल्ह्यात खरेदी करणार्‍या यंत्रणेने शेतकर्‍यांना सांगितले आहे.

शेतकरी दिशाहीन

शासकीय तूर खरेदी केंद्रावर दोन महिन्यांपासून कागदपत्रे देऊन नोंद करून मेसेज येण्याची वाट पहात बसणार्‍या अनेक शेतकर्‍यांना दोन दिवसांपूर्वी शासकीय तूर खरेदी केंद्रावर बंद झाल्याची माहिती मिळाली. काही शेतकर्‍यांनी खरेदी केंद्र गाठले तर केंद्रावर कोणीही नाही. आता काय करावं अन् कुणाकड जावं या प्रश्‍नाने शेतकरी हवालदिल झाले होते. दिशाहीन झालेल्या शेतकर्‍यांना सध्यातरी मार्ग दिसेनासा झाला आहे.

नेत्यांचे दुर्लक्ष

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे होणारे हाल राजकीय नेत्यांना दिसले नाहीत का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या बाबत सर्व राजकीय नेते मंडळींनी एकत्र येऊन शेतकर्‍यांची होणारी पिळवणूक बंद करावी अशी मागणी होत आहे.