Fri, Jan 18, 2019 12:56होमपेज › Marathwada › पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा

पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 12:05AMपाथरी : प्रतिनिधी

मान्सूनचे आगमन लवकर होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. मात्र अद्याप पेरणीयोग्य दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
गेल्या आठवड्यात दररोज ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने आज पाऊस येईल उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी जोरदार पावसाची वाट पाहत आहे, पण रिमझिम पाऊस पडून उघाड देत आहे.

पावसाची वाट पाहत मृग नक्षत्र उजडले आहे. गेल्या आठ दिवसांपासून हुलकावणी देणार्‍या पावसाने मृगात तरी जोरदार हजेरी लावून पेरणीलायक पाऊस व्हायला हवा अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. तीन वर्षांपासून नेहमीच उशिरापर्यंत न येणार्‍या पावसाचे या वर्षी लवकरच आगमन होणार असल्याचे हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे लग्नसराईत गुंतलेल्या बळीराजाने शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली.  

खरिपाच्या पेरण्या या वर्षी वेळेवर होणार यामुळे शेतकरी उर्वरित शेतीची कामे पूर्ण करण्यात मग्न झाला. गेल्या आठवड्यात ढगांच्या आगमनाने शेतकर्‍यांना हायसे वाटले.अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाथरी तालुक्यात दररोज ढग भरून येत आहेत, पण रिमझिम पाऊस पडून उघाड देत आहे. आता तर मृगाचेही आगमन झाले आहे. 

मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली, पण मृग नक्षत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा पाथरी तालुक्यातील शेतकर्‍यांना असून या वर्षी तरी खरिपाच्या पेरण्या वेळेवर व्हाव्यात, यासाठी देवदेवतांना साकडे घातले जात आहे.