Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Marathwada › आंदोलकांची दगडफेक; पोलिसांचा लाठीमार

आंदोलकांची दगडफेक; पोलिसांचा लाठीमार

Published On: Jul 27 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 1:33AMपरभणी : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता  26 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान  करण्यात आंदोलनास हिंसक वळण मिळाल्याने झालेल्या दगडफेकीत लाठीचार्जमध्ये आंदोलकांसह पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने जखमी झाले.दरम्यान आंदोलकांनी शहरात तुफान दगडफेक केल्याने बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्यात आली.  यामुळे  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.  

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात धरणे आंदोलनास सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली, परंतु या आंदोलनादरम्यानच जमलेल्या युवकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करून शहर बंदचे आवाहन केले. दुकाने बंद करण्यासाठी शहरातील रस्त्या-रस्त्यावर तरुणांचे टोळके दुचाकींवरून फिरत असल्याने व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद केली. आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या बाचाबाचीमुळे आंदोलन पेटले आणि जमावाने त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.  आरक्षणाची मागणी करीत सरकार विरोधी घोषणाबाजी करणार्‍या तरुणांनी शहरातील दर्गारोड, शिवाजी चौक, अपना कॉर्नर, ग्रॅन्ड कॉर्नर, स्टेडिअम कॉम्प्लेक्स, वसमत रोडवरील शिवाजी कॉम्पलेक्स, स्पंदन हॉस्पिटल परिसर,  जिंतूर रोड परिसर आदी ठिकाणी तुफान दगडफेक  केली. शासनाने मराठा आरक्षण त्वरित घोषित करावे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत घोषणाबाजी करून युवकांनी शहर दणाणून सोडले.

पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न 

आंदोलनाप्रसंगी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या युवकाने मारहाण करणार्‍या पोलिसास समोर आणा असे म्हणत पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी तैनात पोलिसांनी मध्यस्थी करून संबंधितांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु युवकांनी पोलिसांच्या दिशेने धावून दगडफेक करणे सुरू केले. त्यामुळे पोलिसांनी अधीक्षक कार्यालयासमोर साखळी करून दोन्ही बाजूने येत असलेल्या जमावास रोखले. 

शासकीय जीपची तोडफोड

परभणी ः पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केल्याने 55 युवक जखमी झाले. वसमत रोडवरील स्पंदन रुग्णालयासमोर एका शासकीय वाहनाची तोडफोड करण्यात आली असून बसस्थानकानजीक रस्त्यावर टायर्स जाळण्यात आले.  परभणी शहरात मराठा समाज आरक्षण मागणीवरून आंदोलनकर्ते व पोलिसांत राडा झाला. यामुळे शहरात सर्वत्र तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यातच मराठा समाजातील युवकांचे जत्थेच्या जत्थे ठिकठिकाणी दिसत होते. काही ठिकाणी तर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या पोलिसांच्या लाठीचार्जमुळे तब्बल 50 ते 55 मराठा समाजाचे युवक जखमी झाले आहेत. तसेच वसमतरोड परिसरातील स्पंदन रुग्णालयासमोर शासकीय जीपवर गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास दगडफेक झाली. तसेच डॉक्टरलेन परिसरात दोन ठिकाणी रस्त्यावर टायर जाळले. बसस्थानक परिसरात रस्त्यावर जमावाने तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिस ताफा येताच जमाव पांगविण्यासाठी लाठीमार झाला.