Mon, Mar 25, 2019 13:52होमपेज › Marathwada › भिसे यांच्या रासप प्रवेशाने समीकरणे बदलणार

भिसे यांच्या रासप प्रवेशाने समीकरणे बदलणार

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 12:28AMहिंगोली : प्रतिनिधी

मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे पाटील यांनी सोमवारी राष्ट्रीय समाज पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मराठा शिवसैनिक सेनेच्या माध्यमातून जिल्हाभरात तगडे संघटन उभे केल्यामुळे चर्चेत आलेले भिसे पाटील यांचा रासपमधील प्रवेश कळमनुरी विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, या मतदारसंघात मोठे फेरबदल होतील असा दावा राजकीय तज्ज्ञांनी केला आहे.

तीन वर्षांपासून भिसे यांनी मराठा शिवसैनिक सेनेच्या माध्यमातून गाव पातळीवर युवकांचे मोठे संघटन उभे केले आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत चर्चा सुरू होत्या. सोमवारी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी त्यांचा प्रवेश निश्‍चित होताच त्यांना युवा शाखेची प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने भविष्यात जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाला वजनदार नेत्याची आवश्यकता होती. केवळ हटकर, धनगर समाजाचा पक्ष म्हणून रासपकडे न पाहता, तो सर्व समाजाला आपला पक्ष वाटावा या हेतूने जानकर यांनी काही दिवसांपासूनच जिल्ह्यात एका तगड्या नेतृत्वाचा शोध सुरू केला होता. यातून विनायक भिसे यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाल्याने त्यांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघ संमिश्र मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तेथे नेहमीच ओबीसी नेतृत्वाचा पगडा राहिला आहे. 1995 पर्यंत माजीमंत्री रजनीताई सातव यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर 95 नंतर दहा वर्षे शिवसेनेचे माजी आ. गजानन घुगे यांनी वर्चस्व गाजविले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसचे नेते विद्यमान खासदार राजीव सातव यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आपले पाय घट्ट रोवले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे निवडून आल्याने हा मतदारसंघ कायम ओबीसींच्या नेतृत्वाखाली राहत असल्याचे लक्षात आल्याने येथे रासपकडून तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2014 च्या निवडणुकीत कै. माधवराव नाईक यांना रासपकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांच्या पश्‍चात मतदारसंघात सामान्यांशी नाळ जुळलेल्या नेत्याच्या शोधात रासपचे स्थानिक नेते होते. 

अखेर भिसे यांना रासपमध्ये ओढून कळमनुरी विधानसभा मतदारसंघात रासपचे मोठे आव्हान उभे केले आहे. कळमनुरीमध्ये मराठा समाजाबरोबरच आदिवासी, बौद्ध, हटकर, धनगर व मुस्लिम असा मोठा मतदार असल्याने सर्वमान्य चेहरा देण्याचे आव्हान रासपपुढे होते. भिसे यांच्या प्रवेशामुळे सर्व समाजाची मोट बांधण्यात रासप सध्या तरी यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.