Sun, Aug 25, 2019 01:31होमपेज › Marathwada › बीड : प्रशासनाच्या अनास्थेमुळे नारायणवाडीचे ग्रामस्थ मतदानास मुकले

बीड : प्रशासनाच्या अनास्थेमुळे नारायणवाडीचे ग्रामस्थ मतदानास मुकले

Published On: Apr 18 2019 7:23PM | Last Updated: Apr 18 2019 7:23PM
शिरुर कासार (जि. बीड) : प्रतिनिधी

देश स्वतंत्र होऊन आणि प्रत्यक्षात लोकशाहीला अस्तित्वात येऊन जवळपास ७० वर्षाचा कालावधी लोटत आला आहे. परंतु, एवढ्या दिर्घ काळानंतरही ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते पाणी व इतर मुलभूत सुविधा मिळवण्यासाठी आज ही संघर्ष करावा लागत आहे. हे नागरिकांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. शिरुर कासार तालुक्यातील नारायणवाडी येथील रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागावा यासाठी ग्रामस्थाकडून लोकसभा निवडणुकांवर टाकलेला बहिष्कार प्रशासकीय धोरणामुळे व अनास्थेमुळे नाईलाजास्तव पूर्णत्वास न्यावा लागला. त्यामुळे नारायणवाडीच्या नागरिकांना लोकशाहीच्या महत्त्वाच्या प्रक्रियेपासून वंचित राहावे लागले. 

शिरुर कासार तालुक्यातील नारायणवाडी हे दोन विधानसभा मतदारसंघाच्या सरहद्दीवर वसलेले १३५० लोकसंख्याचे गाव. गावातून बाहेर पडण्यासाठी केवळ एकच रस्ता तोही कायम दुर्लक्षीत राहिलेला. यामुळे ग्रामस्थांना सदासर्व काळ मरणयातना भोगाव्या लागत असल्याने समस्थ नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा गावातील ७३३ मतदार मतदानावर बहिष्कार टाकतील असे निवेदन तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी व तहसिलदांना देण्यात आले होते. परंतु या तीन महिन्यांच्या कालावधीत या गावाकडे प्रशासनाने ढुंकून ही पाहिले नाही. यामुळे ग्रामस्थ अधिक संतापले व ऐन निवडणुकीच्या दिवशी शिरुर तहसिलदार यांनी या गावाकडे धाव घेतली. परंतु, ग्रामस्थांनी आम्हाला केवळ जिल्हाधिकाऱ्यानीच याबाबतीत लेखी आश्वासन दिले तरच मतदान करू असे बजावले. अखेर तहसिलदार व त्यांच्या शिष्टमंडळाला माघारी परतावे लागले व यानंतर मतदानाची वेळ संपेपर्यंत कोणताच प्रशासकीय अधिकारी या गावाकडे फिरकला नाही. प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे येथील ग्रामस्थांना लोकशाहीच्या सर्वोच्च अधिकारापासून मुकावे लागले.