Mon, Mar 25, 2019 13:40होमपेज › Marathwada › धस-जगदाळेंमध्ये आज टशन

धस-जगदाळेंमध्ये आज टशन

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMबीड : प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद मतदारसंघासाठी अर्ज भरण्यापासूनच बीड-लातूर-उस्मानाबाद या मतदार संघाची निवडणूक राज्यात गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराने शेवटच्या घटीकेला माघार घेतल्याने राष्ट्रवादीला जोरदार हाबाडा बसला आहे. या हाबाड्याचे पॅचअप करीत राष्ट्रवादीने पुन्हा मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे सुरेश धस यांच्या पाठिशी पालकमंत्री पंकजा मुंडे, मंत्री संभाजी निलंगेकर यांनी ताकद उभा केल्याने सुरेश धस यांना हत्तीचे बळ आले आहे. या निवडणुकीसाठी आज सोमवारी मतदान होत आहे. 

बीड-लातूर-उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघाची ही निवडणूक कधी नव्हे ती यावेळी प्रचंड चर्चेची ठरली आहे. निवडणुकीच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीने भाजपचे रमेश कराड यांना गळ लावत भाजपवर चाल केली, मात्र ऐनवेळी रमेश कराड यांनी माघार घेतल्याने बुमरँग होत राष्ट्रवादीलाच चेकमेट बसला. यामुळे बॅकफूटवर आलेल्या राष्ट्रवादीने अशोक जगदाळेंना पुरस्कृत केले. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिका सदस्य व नगरपंचायतचे सदस्य मतदार आहेत. संपूर्ण मतदार संघात एक हजार सहा मतदार असून बीड जिल्ह्यात 361 मतदार आहेत. आज सोमवारी बीड जिल्ह्यातील सर्व 11 तहसीलवर मतदान प्रक्रिया होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदान करता येणार आहे. यानंतर मतपत्रिका उस्मानाबादला रवाना करण्यात येणार आहेत.  मतमोजणी 24 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सर्व मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठीही काळजी घेण्यात आली आहे. 

ही निवडणूक धस-जगदाळे यांच्यात थेट होत असली तरी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात सामना रंगला आहे. निवडणुकीदरम्यान आरोप-प्रत्यारोपांची झालेली आतषबाजी, लक्ष्मीदर्शनाची चर्चा, याची राष्ट्रवादी व भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली दखल त्यामुळे ही निवडणूक आगामी लोकसभा व विधानसभेची रंगीत तालीम समजली जाऊ लागली आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारेल, याची उत्सुकता असून त्यासाठी आज मतदानाची टशन आहे.