Sat, Mar 23, 2019 16:28होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांना तूर विक्रीसाठी विदर्भाचा आधार 

शेतकर्‍यांना तूर विक्रीसाठी विदर्भाचा आधार 

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 11 2018 12:39AMतळणी : प्रतिनिधी 

मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना तूर विक्री करण्यासाठी पंचाईत होत आहे. परिसरातील पंधरा ते वीस गावांच्या शेतकर्‍यांना  विदर्भात जाऊन तूर विक्री करावी लागत आहे. चांगले दर व नगदी पैसे मिळत असल्याने शेतकरी विदर्भाला प्राधान्य देत आहे.

या परिसरातील शेतकरी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी  उदासीन आहेत. ही  प्रक्रिया किचकट वाटत आहे. मागील वर्षी या परिसरात तुरीचे मोठे उत्पादन झाले होते. शासनाच्या हमीभावानुसार या परिसरातील शेतकर्‍यांना याचा फायदा घेता आला नाही. नाफेडच्या केद्रांवर तूर न्यायची झाली तर वाहतूक खर्च व वेळेच्या नियोजनानुसार न परवडणारे आहे. विदर्भातील नाफेडच्या केंद्रावर मराठवाड्यातील तूर घेतली जात नसल्याकारणाने खासगी मार्केटला तूर विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. 

लोणार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड व वाशिम या तीनही ठिकाणी तळणी परिसरातून तूर विक्री करण्यासाठी शेतकर्‍यांची  लगबग आहे. रिसोड व वाशिम या दोन ठिकाणी तूर विक्री करण्याचा शेतकर्‍यांचा कल आहे. कारण माल विक्री केल्यानंतर लगेच या ठिकाणी शेतकर्‍यांना नगदी स्वरूपात पट्टी मिळते. लोणार येथे मात्र चेकद्वारे किंवा आरटीजीएस पद्धतीने शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात. बॅकेच्या कटकटीमुळे लोणार येथे तूर विक्री करण्यास शेतकरी टाळाटाळ करतो. हीच पध्दत मंठा बाजार समिती मध्ये असल्याने तेथेही तूर विक्री नेण्यास शेतकर्‍यांत उत्साह दिसून येत नाही. तळणीला बाजार समितीचा किंवा उपबाजार  समितीचा दर्जा मिळाला तर या परिसरातील वीस ते पंचवीस गावांतील शेतकर्‍यांचा माल विक्री करण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटू शकतो. दरम्यान, शेतकर्‍यांच्या मागणीवरून येत्या 12 फेबु्रवारी रोजी मंठा येथे नाफेडचे तूर विक्री केद्र सुरू होणार असून आतापर्यंत 502 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे.