Fri, Apr 19, 2019 12:05होमपेज › Marathwada › कृषी कार्यालयातच वृक्षांची कत्तल

कृषी कार्यालयातच वृक्षांची कत्तल

Published On: Feb 13 2018 2:41AM | Last Updated: Feb 13 2018 2:22AMवसमत : प्रतिनिधी

वसमत कृषी चिकित्सालय तालुका फळ रोपवाटिका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत असलेली निलगिरी वृक्ष विक्री करून त्या नावावर लिंबासह आदी वृक्षांची कत्तल करून आपले उखळ पांढरे केले जात असल्याचा प्रकार येथे समोर आला आहे. या गंभीर प्रकाराकडे त्वरीत लक्ष न दिल्यास परिसरातील वृक्ष संपदा मोठ्या प्रमाणावर नष्ट होण्याची शक्यता आहे. शासन एकीकडे वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असून कृषी कार्यालयातच वृक्षांवर कुर्‍हाड चालवली जात आहे. वसमत कृषी कार्यालयांतर्गत कृषी चिकित्सालय तालुका फळरोप- वाटिका कृषी अधिकारी यांनी 28 डिसेंबर 2017 रोजी त्यांच्या अंतर्गत असलेली निलगिरीची 20 झाडे प्रतिटन 1500 रुपये याप्रमाणे वसमत शहरातील एका व्यक्‍तीस दिली आहे.

मात्र कागदोपत्री मेळ पूर्ण करून आर्थिक व्यवहारानंतर दुसर्‍यांनाच त्या वृक्षांच्या कत्तलीचे आदेश  देण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच फळरोप वाटिकांतर्गत मृत वृक्षांची संख्या कमी प्रमाणात असतानादेखील जिवंत लिंबाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात रक्‍कम मोजून कत्तल करण्यात आली आहे. सदरील प्रकाराविषयी संबंधित कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात त्यांनी बोलणे टाळले. शासन वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करून वृक्षांची लागवड करीत आहे. या उलटच कृषी कार्यालयात प्रकार पाहावयास मिळत आहे. या संदर्भात वरिष्ठांनी लक्ष देऊन योग्य ती चौकशी केल्यास दोषी अधिकारी समोर येऊ शकतात.