Tue, May 21, 2019 18:53होमपेज › Marathwada › परळीत २२ बटूंवर उपनयन संस्कार

परळीत २२ बटूंवर उपनयन संस्कार

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 10:26PMपरळी : प्रतिनिधी

ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळीच्या वतीने आयोजित 39 वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज 20 एप्रिल रोजी शानदार व  वैभवी स्वरुपात संपन्न झाला. शानदार सोहळ्यात 22 बटूंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. संत-महंत, मान्यवर व समाज बांधवांची सोहळ्यासाठी मोठी उपस्थिती  लाभली.

गेल्या 39 वर्षांपासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळीच्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो. शानदार आयोजन, नियोजनबद्ध सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा सकाळी हालगे गार्डन येथे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चार व विधीपूर्वक संपन्न झाला. या सोहळ्याचे पौरोहित्य मनोहर देव जोशी व ब्रह्मवृंदांनी केले. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या 22 बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. यावेळी जगद‍्गुरू द्वारा आचार्य अमृताश्रम स्वामी,  भरतबुवा रामदासी यांचे अशीर्वचन झाले. यावेळी आद्य शंकराचार्य जयंती, धर्मपालन व  उपनयन संस्कारांचे महत्त्व त्यांनी यावेळी विशद केले.

या सोहळ्याला राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री  पंकजा  मुंडे, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते  धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधी, आदी उपस्थित होते. यावेळी पंकजा  मुंडे यांचे रितीरिवाजानुसार  सौभाग्य लेणे देऊन  पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. तर पारंपरिक पद्धतीने स्वागत  पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल धनंजय मुंडे यांचा ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.   सूत्रसंचालन प्रशांत जोशी, प्रा. रवींद्र जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन जितेंद्र नव्हाडे यांनी केले.  

Tags : Marathewada, Upanayan,  rituals, 22, buttocks,  Parli