Sat, Mar 23, 2019 16:18होमपेज › Marathwada › अवकाळी पाऊस;  नुकसानीचे त्वरित पंचनामे करा : पंकजा मुंडे 

अवकाळी पाऊस;  नुकसानीचे त्वरित पंचनामे करा : पंकजा मुंडे 

Published On: Feb 11 2018 2:48PM | Last Updated: Feb 11 2018 2:48PMबीड : पुढारी ऑनलाईन 

बीड तालुक्यासह माजलगांव आणि गेवराई तालुक्याला आज सकाळी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त गावांना लवकरच भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  

जिल्हयात आज सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. पण,  बीड, माजलगांव आणि गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बीड तालुक्यातील वांगी, शिवणी, माजलगांव तालुक्यातील काळेगाव, हिवरा, डुबाथडी, तालखेडचा परिसर, केसापूरी शिवार, गेवराई तालुक्यातील खळेगांव, पौळाची वाडी आदी गावांमध्ये गारांसह पडलेल्या पावसाने गहू, ज्वारी पिकांसह आंबा, डाळिंब आदी फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी तातडीने दखल घेत सकाळीच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश त्यांनी दिले. नुकसानग्रस्त गावांना लवकरच भेट देणार असून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले. 
 

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनीही दिले आदेश 
 

मराठवाड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत. जिल्हा प्रशासनाने उद्या विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी दिले. 

राज्यातील ज्या भागात आज अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्याचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला. त्यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत चर्चा केली.

ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचे तसेच काढणी पश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे त्याबाबत माहिती त्वरित विमा कंपन्यांना कळवावी. यासाठी जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी उद्या संबंधीत विमा कंपन्यांची बैठक घ्यावी व त्यांना झालेल्या नुकसानाबाबत गावनिहाय शेतकऱ्यांची माहिती द्यावी. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवसातील माहितीही इमेल द्वारे देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून संबंधित विमा कंपनीला बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध करून देत येईल. 

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनी देखील पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करावा, अशा सुचना कृषिमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.