Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Marathwada › जिल्ह्यात कोट्यवधीचे व्यवहार ठप्प

जिल्ह्यात कोट्यवधीचे व्यवहार ठप्प

Published On: May 31 2018 1:40AM | Last Updated: May 30 2018 10:17PMपरभणी : प्रतिनिधी

बँकर्स व सरकारने दिलेल्या 2 टक्के वेतनवाढीच्या विरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने 30 व 31 मे असा सलग दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे. यात पहिल्या दिवशी राष्ट्रीयीकृत बँकांमधील तब्बल 800 कर्मचारी व अधिकारी यांनी विविध मागण्यांसाठी संपात सहभाग नोंदवला. यामुळे जिल्ह्यातील जवळपास 2 हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.

देशातील दहा लाख बँक कर्मचारी व अधिकारी हे आपल्या वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. यात जिल्ह्यातील 19 राष्ट्रीयीकृत बँकांमधील तब्बल 800 कर्मचारी व अधिकारी यांनी आपला सहभाग संपात नोंदवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सलग 48 तासांचा संप दि. 30 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू करण्यात आला आहे. संप कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी निदर्शने करत इंडियन बँक असोसिएशन व केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्‍त केला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनमध्ये समाविष्ट असलेल्या 9 संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून बँक कर्मचार्‍यांना सध्याची परिस्थिती व इतर बाबतींत संघटनेचे पदाधिकारी डॉ. सतीश टाके, सुनील हट्टेकर, भास्कर विभुते, अशोक पिल्‍लेवार, सौरभ देगावकर मार्गदर्शन केले. 

संप कालावधीतील दुसर्‍या दिवशी म्हणजे 31 मे रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी चौकातील बँक ऑफ बडोदा येथे निदर्शने केली जाणार आहेत. या संपामुळे जिल्हाभरातील तब्बल 2 हजार कोटी रुपयांचे व्यवहार पहिल्याच दिवशी ठप्प झाल्याने सर्वसामान्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले.