Thu, Jul 18, 2019 16:34होमपेज › Marathwada › घर बांधून देत शिवजयंतीदिनी अनोखा उपक्रम

घर बांधून देत शिवजयंतीदिनी अनोखा उपक्रम

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 21 2018 12:40AMमानवत : डॉ.सचिन चिद्रवार

घरच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला हतबल होऊन आपली जीवनयात्रा संपवलेल्या शेतमजुराच्या कुटुंबास सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींनी एकत्रित येऊन हक्काचा राजमुद्रा निवारा बांधून देऊन शिवजयंतीदिनी सुपूर्द केला. सदरील शिवसन्मान सोहळा 19 फेब्रुवारी तालुक्यातील उकलगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला अन् त्या कुटुंबाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. 

तालुक्यातील उकलगाव येथील शेतमजूर अच्युत अनुरथ उकलवार या भूमिहीनाने परिस्थितीला कंटाळून 25 फेब्रुवारी 2016 ला आत्महत्या केली. त्यांच्या या आत्महत्येमुळे त्यांची आई, पत्नी, 2 मुले व 1 मुलगी यांच्यावर जणू आभाळच कोसळले. उकलगावला कुडाच्या घरात हे कुटुंब राहते. गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दिगांबर भिसे यांनी या कुटुंबाबाबत माहिती 13 ऑगस्ट 2016 ला सामाजिक जाण असणारे मानवत येथील शासकीय निवासी शाळेवर कार्यरत असणारे श्यामसुंदर निरस या शिक्षकाच्या कानावर घातली. निरस यांनी या कुटुंबासाठी काहीतरी करावे या उद्देशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून वेदनामय भावना शब्दरूपी मांडल्या. राजू वाघ व विलास साखरे यांनी निरस यांच्या साथीने निधी जमवून गेल्या वर्षी शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला सदरील कुटुंबाला मिरची कांडप व पिठाची गिरणी दिली; परंतु सदरील शेतमजुराच्या कुटुंबाचे हाल निरस यांना बघवले नाही.

लहानशा कुडाच्या घरात हे कुटुंब राहत होते. त्यांना कायमस्वरूपी निवारा बांधून द्यावा, अशी इच्छा निरस यांची झाली. त्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वीपासूनच प्रयत्न सुरू केले. झरी (ता. जिंतूर) येथील सामाजिक कार्यकर्ते कांतराव झरीकर यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. झरीकर यांनीदेखील या कामास भरीव मदत करण्याचे ठरवले. जिंतूर येथील डॉ. वाघमारे दाम्पत्य, पत्रकार सूरज कदम, मानवतचे डॉ. सचिन कदम, प्रा. सुभाष ढगे, दिगांबर भिसे, राजू वाघ, विलास साखरे, केशव, अंगद भरोसे, भरत नखाते, माणिक जाधव, विलास खुपसे, सतीश शिंदे, बाळू खोडके, सुनील कांबळे, सरपंच नाथाभाऊ पिंपळे यांचा खारीचा वाटा उचलून अन्य निधी जमा करीत सदरील कुटुंबाला राजमुद्रा नावाचा निवारा कायमस्वरूपी उभारून दिला. 

19 फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कांतराव झरीकर यांच्या अध्यक्षतेखाली राजमुद्रा निवारा सुपूर्द करण्याचा शिवसन्मान सोहळा उकलगावात पार पडला. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतमजुराच्या कुटुंबास घराची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी डॉ. वाघमारे, प्राचार्य नितीन लोहट, गटशिक्षणाधिकारी संजय ससाणे, डॉ. सचिन कदम, डॉ. निवृत्ती पवार, केंद्रप्रमुख शिरीष श्यामसुंदर निरस आदींची उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून शिवजयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबाची होणारी वाताहत थांबविण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेेतमजुराच्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शिक्षक श्यामसुंदर निरस यांच्या संकल्पनेतून साकार झालेला राजमुद्रा हा निवारा उभारण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी आपापल्या परीने मदत केली; परंतु येथील निवासी शाळेत शौचालय सफाई करणार्‍या शेवंताबाई कागडा या महिला कर्मचार्‍याने देखील आपले एक दिवसाचे वेतन दिले. तसेच याच कार्यक्रमात प्रा. नितीन लोहट यांनी या परिवारातील दोन्ही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले.