Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › चोर समजून पेंडगाव परिसरात दोघांना मारहाण

चोर समजून पेंडगाव परिसरात दोघांना मारहाण

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 02 2018 10:43PMबीड : प्रतिनिधी

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर पेंडगाव परिसरात दारू प्राशन केलेल्या व एका वेडसर व्यक्तीला चोर समजून परिसरातील ग्रामस्थांनी मारहाण केली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक शितलकुमार बल्लाळ यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी  कर्मचार्‍यांना घटनास्थळी पाठविले, त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांची जमावातून सुटका केली. 

मुकुंद दुषी व अशोक माथाडे असे त्या दोघांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गावर पेंडगाव नजीक रविवारी रात्रीसाडे अकराच्या दरम्यान मुकुंद मुरलीधर दुषी (वय 45 रा. करिमपुरा, बीड), अशोक मोहन माथाडे (रा. खंडवा, मध्यप्रदेश) हे दोघे रस्त्यावरून येणार्‍या ट्रकला अडवत होते. त्यांना विचारणा केली असता ते वेडे असल्याचे सोंग करत आहेत, अशी माहिती परिसरातील एका ग्रामस्थाने सपोनि बल्लाळ यांना दिली. त्यांनी तत्काळ या मार्गावर असलेलेेे पोलिस उपनिरिक्षक गायकवाड, पोलिस कर्मचारी येळे यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. घटनास्थळी दाखल होईपर्यंत काही जणांनी त्या दोघांना चोर समजून मारहाण केली. पोलिस घटनास्थळी आल्यावर दोघांची जमावातून सुटका केली. मुकुंद दुषी हा वेडसर असल्याचे समोर आले. दारू पिलेल्या अवस्थेत असलेला अशोक माथाडे हा चोर नसून तो ट्रकवर क्लिनर असल्याचे चौकशीत समोर आले. रविवारी रात्री त्याचे ट्रक चालकाशी वाद झाल्याने चालकानी त्याला पेंडगाव परिसरात महामार्गावरच सोडून दिले होते. त्यामुळे तो दुसर्‍या ट्रकला हात करत असल्याचे निष्पन्न झाले.  परिसरातील जमावाला त्यांची चूक लक्षात आली. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.