Tue, Jul 23, 2019 10:29होमपेज › Marathwada › अंबाजोगाईत अनधिकृत बांधकामे वाढली  

अंबाजोगाईत अनधिकृत बांधकामे वाढली  

Published On: Aug 25 2018 1:15AM | Last Updated: Aug 24 2018 11:55PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

अंबाजोगाई नगर पालिकेला तीन मजली बांधकामाची परवानगी देण्याचा अधिकार आहे. मात्र संबंधित बांधकाम करणारे तीन मजल्यांचा परवाना काढून प्रत्यक्षात मात्र सहा-सहा मजले चढविण्याचा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. प्रशांतनगर भागातील एका खाजगी रुग्णालयाच्या इमारतीचा फक्त तीन मजल्यांचा परवाना घेऊन संगलमताने सहाव्या मजल्यापर्यंतचे काम सुरू आहे. तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक या बांधकामाच्या विरोधात 28 ऑगस्टपासून उपोषणास बसणार आहेत, तर पालिका विरोधातील दुसर्‍या प्रकरणात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 

प्रशांतनगर भागातील मल्लिकार्जून काशीनाथअप्पा वारद व नागनाथअप्पा वारद यांचे वडिलोपार्जित घर असून त्यांच्या घरालगतच डॉ. नितीन पोतदार यांनी आपले खाजगी रुग्णालय उभारण्यासाठी बांधकाम सुरू केले. या बांधकामाची रितसर परवानगी डॉ. पोतदार यांनी नगर पालिकेकडून तळमजला, पहिला व दुसरा मजला अशा बांधकामाची परवानगी घेतली असली तरी बांधकाम परवाना देताना पालिकेने पूर्व-पश्‍चिम-उत्तर या दिशेला दीड मीटर व दक्षिणेला तीन मीटर मोकळी जागा सोडून बांधकाम करण्याबाबत नियमावली पालिकेने लावून दिली असूनही प्रत्यक्षात मात्र संबंधित डॉ. पोतदार यांनी कुठेही मोकळी जागा न सोडता शेजार्‍याच्या भिंतीलगत बांधकाम सुरू केले. पालिकेने दिलेल्या बांधकाम परवान्याप्रमाणे हे बांधकाम होत नसल्याने मल्लिकार्जून वारद व नागनाथ वारद यांनी पालिकेकडे संबंधित बांधकाम थांबवून परवान्याप्रमाणे नियमानुसार बांधकाम करण्याबाबतची तक्रार पालिकेकडे केली होती. मात्र, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. संबंधितावर कुठलीच कार्यवाही होत नसल्याने वारद यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 

दुसर्‍या प्रकरणात शहरातील मिलिंदनगर भागातील विश्‍वनाथ मल्हारी कांबळे यांच्या घराशेजारी झालेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी व पिठाची गिरणी हलविण्यासाठी कांबळे हे मागील 1 वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. 27 मार्च, 12 मे व 15 डिसेंबर 2017 या तीन वेळा पत्र देऊन उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन कारवाई मागणी केली होती, परंतु यात प्रशासनाने कुठलीही भूमिका न घेतल्याने विश्‍वनाथ कांबळे हे ज्येष्ठ नागरिक प्रशासनाच्या विरोधात 17 नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांसमवेत जिल्हा परिषदेच्या मैदानावर आत्मदहन करणार असल्याचा इशारा अप्पर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.