Sun, Apr 21, 2019 14:08होमपेज › Marathwada › आरक्षणासाठी ७ पर्यंतचा अल्टीमेटम

आरक्षणासाठी ७ पर्यंतचा अल्टीमेटम

Published On: Aug 03 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 12:32AMबीड : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणासाठी 18 जूनपासून परळी येथे आंदोलन सुरू आहे. यानंतर आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले. गुरुवारी परळी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील समन्वयकांची बैठक पार पडली. यावेळी मराठा आरक्षणासाठी सरकाला सात ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी राज्यभरात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला, दरम्यान मराठा क्रांती मोर्चाने रस्त्यावर आंदोलन न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. 

मराठा समाजास आरक्षण द्यावे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, कर्जमाफी यासह इतर मागण्यांसाठी 18 जूनपासून परळी येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. यानंतर राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन झालेले आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील समन्वयकांनी परळी येथे बैठक घेतली. यावेळी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह जर कोणी असे आंदोलन केल्यास त्याचा व मराठा क्रांती मोर्चाचा काही संबंध राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

सरकारने मराठा समाजास सात ऑगस्ट पर्यंत आरक्षण द्यावे, मेगा भरती रद्द करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. सात ऑगस्ट पर्यंत आरक्षण देण्याचा अल्टिमेटमही यावेळी सरकारला देण्यात आला. यानंतर नऊ ऑगस्ट रोजी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. परळीसह राज्यात यापुढे ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अंबाजोगाई तालुक्यातील राडी ग्रामपंचायतने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळावे म्हणून मासीक बैठकीत आरक्षणाचा ठराव घेतला. या ठरावीची प्रत व निवेदन तहसीलदार रुईकर यांना देण्यात आले. यावेळी सुरेखा गंगणे,  अरुण बनसोडे उपस्थित होते.

आजपासून ठिय्या आंदोलन

केज : केज तहसील कार्यालयासमोर आज शुक्रवारपासून मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक समितीच्या वतीने देण्यात आली. गुरुवारी सकाळी अंबाजोगाई चे अप्पर पोलिस अधिक्षक व उपजिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत केज तहसील कार्यालयामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक झाली. सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. त्यामुळे यापुढे केज तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. एकाच वेळी न येता दरोरोज एका गावातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

अंमळनेर येथे रास्ता रोको

अंमळनेर : पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील भवानी चौकात गुरुवारी मराठा समाज्याच्या वतीने बीड-कल्याण महामार्गागावर दोन तास रास्ता रोको करण्यात आला. तहसीलदार रूपा चित्रक व अंमळनेर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक विशाखा धुळे यांना मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अंमळनेर ठाण्यातील पोलिस कर्मचारी व दंगल नियंत्रण पथक यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. अतिशय शांततेत आणि संयमाने हे आंदोलन पार पडले. अंमळनेर, धोपटवाडी,जरेवाडी,पिंपळवंडी, जाधववाडी, कुसळंब, गायकवाडी, आंबेवाडी, चंद्रेवाडी, दौलतवाडी, कोतन, पांढरवाडी, साकुंडवाडी येथील शेकडो मराठा बांधव आणि शालेय विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने झाली.