Mon, Jul 22, 2019 13:18होमपेज › Marathwada › ग्रामस्थांमुळे उदमांजर पिल्लांना मायेची ऊब

ग्रामस्थांमुळे उदमांजर पिल्लांना मायेची ऊब

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 11:11PMशिरूर/केतुरा : प्रतिनिधी

वृक्षतोड, घटलेले जंगल क्षेत्र यामुळे वन्यप्राण्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. बीड तालुक्यातील केतुरा येथील शाळेच्या खोलीमध्ये येऊन एका उदमांजराने पाच पिल्‍लांना जन्म दिला. या उदमांजरांना ग्रामस्थांनी मायेची ऊब दिली. याची माहिती शिरूर येथील सर्पराज्ञीचे सिद्धार्थ सोनवणे यांना दिली. त्यांनी केतुरा येथे जाऊन उदमांजरांना ताब्यात घेतले. या उदमांजराचे आता सर्पराज्ञीत पालनपोषण सुरू आहे.

दिवसेंदिवस वन्यजीवांची आश्रयस्थाने कमी होत आहेत.त्यामुळे त्यांना त्यांचा वंश वाढीसाठी, गर्भधारणा नंतर पिल्लं देण्यासाठी लागणार्‍या जागेसाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. बाळंतपणासाठी  जागेच्या शोधार्थ केतुरा येथील जिल्हा परिषद शाळात आलेले दुर्मिळ उदमांजर हे त्याचे उदाहरण. बुधवारी (दि 12)  केतुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या संगणक खोलीतील माळ्यावर  उदमांजराने पाच पिल्‍लांना जन्म दिला.ही माहिती मुख्याध्यापक संतोष पडुळे यांनी अरुण रहाडे यांना दिली.

उदमांजर जगले पाहिजे यासाठी त्यांनी सिद्धार्थ सोनवणे यांना बोलाविले.  त्यानंतर तत्काळ विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ सोनवणे व शिवाजी आघाव यांनी  घटनास्थळी जाऊन उदमांजर ताब्यात घतेले. यावेळी ग्रामस्थही मोठ्या प्रमाणावर जमले होते. उदमांजर पिल्‍लांना विद्यार्थी वा इतर कोणी काही इजा पोहचू नये, यासाठी ग्रामस्थांनी खबरदारी घेतली. कोणाला या उदमांजराजवळ जाऊ दिले नाही. केतुरा येथून सिद्धार्थ सोनवणे यांनी उदमांजर ताब्यात घेतली असून त्याचा सांभाळ सर्पराज्ञीत सुरू आहे.