चारठाणा : प्रतिनिधी
जिंतूर-मंठा या महामार्गावरील देवगाव फाट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नावळ पाटीनजीक रुग्णवाहिका व मिठाची विक्री करण्यासाठी जाणार्या अॅपे ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अॅपेमधील दोनजण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (दि.23) सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडला. घटनास्थळी जालना जिल्ह्यातील मंठा येथील पोलिसांनी पंचनामा केला. शेख महेबूब शेख करीम (वय 40), शेख रशीद शेख छोटू (वय 38, रा. दोघेही जिंतूर जि. परभणी) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. जिंतूर येथील दोघे नेहमीप्रमाणे अॅपे ऑटो (क्रमांक एम.एच.22 ए.ए.3336) मधून मिठाची पाकिटे घेऊन विक्रीसाठी मंठा येथे जात होते. यात जालना येथून परभणीकडे येणारी रुग्णवाहिका (क्रमांक एम.एच.22 ए.ए.3085) या दोन वाहनांची कर्नावळ पाटीनजीक समोरासमोर जोरदार धडक झाली.
हा अपघात एवढा भीषण होता की, अॅपेमधील दोघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर रुग्णवाहिकेचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. सदर घटनेची माहिती देवगाव, मंठा, चारठाणा येथे मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.