Sat, Nov 17, 2018 03:42होमपेज › Marathwada › तूर खरेदीसाठी अडीच हजार बारदाना उपलब्ध 

तूर खरेदीसाठी अडीच हजार बारदाना उपलब्ध 

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 10:28PMबीड : प्रतिनिधी

वडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर मंगळवारी दुपारी अडीच हजार रिकामी पोत्याचा बारदाना उपलब्ध झाला आहे. यामुळे आता तूर खरेदी पुन्हा एकदा सुरू होणार आहे.सोमवारी दुपारी चार वाजता तूर भरण्यासाठी आवश्यक असणारा रिकामा बारदाना संपल्यामुळे वडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद पडले होते. गेल्या दोन पंधरवड्यात रिकामा बारदाना उपलब्ध नसल्याने हे तूर खरेदी केंद्र बंद पडले होते. सोमवारी पुन्हा बारदाना संपल्यामुळे शेतकर्‍यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. काही शेतकर्‍यांना आपल्या मालाचे माप न करताच परत जावे लागले होते. वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव आंधळे यांनी थेट  जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन या खरेदी प्रक्रियेवर टीका केली होती. 

वडवणी तालुक्यातील शेतकर्‍यांना  वडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर योग्य सेवा मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी सभापती दिनकरराव आंधळे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी  पांडव यांच्याकडे केली आहे. सोमवारी दुपारी रिकामा बारदाना संपल्यावर तत्काळ सभापती दिनकरराव आंधळे यांनी बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.मंगळवारी दुपारी अडीच हजार रिकामी पोते बीड येथून वडवणीतील तूर खरेदी केंद्रावर पाठविण्यात आले आहेत. मात्र येथे कर्मचारी उपलब्ध नसल्याने मंगळवारी दुपारून एकाही शेतकर्‍याचे मापे झाली नाहीत. बुधवारी सकाळी हे केंद्र सुरू होणार असल्याचे  मैंद यांनी सांगितले.

Tags : Marathwada, Twenty, two, thousand, available,  purchase, tur