होमपेज › Marathwada › हमीच्या तूर खरेदीला मुहूर्त मिळेना

हमीच्या तूर खरेदीला मुहूर्त मिळेना

Published On: Jan 31 2018 2:05AM | Last Updated: Jan 31 2018 12:43AMहिंगोली : प्रतिनिधी

मोठा गाजावाजा करून तुरीची हमीभावाने खरेदी करण्याच्या घोषणेला महिना उलटला तरी हिंगोलीत मात्र नाफेडकडून अद्यापही हमीभावाने तुर खरेदी करण्यास सुरूवात झाली नसल्याने तुर उत्पादक शेतकर्‍यांची मोठी कोंडी होत असून,मोंढ्यात शेतकर्‍यांना पड्या दराने आपली तुर विकावी लागत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासन मात्र हातावर हात ठेवून केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकर्‍यांची लूट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मागील वर्षी येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून नाफेडने हमीभावाने तुरीची खरेदी केली. परंतु यामध्ये एजन्सी म्हणून काम करणार्‍या तालुका खरेदी विक्री संघाने तुर उत्पादकांची मोठी आर्थिक लुट केली. तसेच आठ आठ दिवसशेतकर्‍यांना आपला माल विकण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली. तसेच तुरीचे चुकारे मिळण्यासाठी शेतकर्‍यांना महिनोमहिने ताटकळत बसावे लागले. मागील अनुभव लक्षात घेता, तसेच तालुका खरेदी विक्री संघाच्या घोळामुळे यावर्षी बाजार समिती मार्फत नाफेडची तुर खरेदी केली जाणार आहे. सध्या मोंढ्यात दररोज किमान दोन ते अडीच हजार क्‍विंटल तुरीची आवक होत आहे. 

तुरीला केंद्र शासनाने 5450 रूपयाचा हमीभाव जाहीर केला असला तरी, बाजारात मात्र तुरीला 4200 ते 4600 रूपये प्रति क्‍विंटलचा दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचे क्‍विंटलमागे 1 हजार रूपयाचे नुकसान होत आहे. प्रशासनाने केवळ पाच ठिकाणी हमीभावाने तुर खरेदी केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले. परंतु अद्यापही खरेदी केंदाला मुहूर्त मिळाला नसल्याने बाजारात शेतकर्‍यांची प्रचंड पिळवणूक होत आहे. हिंगोली बाजार समितीत आतापर्यंत दीड हजार शेतकर्‍यांनी तुर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी करून पंधरवाडा उलटला तरी खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे.