तुळजापूर : तालुका प्रतिनिधी
आराध्य दैवत, शक्तीदेवता तथा महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीमातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास मंगळवार, 26 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी गेल्या सोमवती अमावास्येदिवशी सुरू झालेली मातेची मंचकी निद्रा मंगळवारी पहाटे पूर्ण होत असून मुख्य मूर्तीची सिंहासनावर पुनर्प्रतिष्ठापना होऊन मूर्तीला नऊ दिवसांनंतर पंचामृत अभिषेक सुरू होणार आहेत. त्यानंतर चरणतीर्थ, काकड आरती पार पडून नित्यपूजेचा घाट सकाळी 6 वाजता होणार आहे.
मातेच्या मूर्तीला दुसर्यांदा पुन्हा पंचामृत अभिषेक सुरू होऊन वस्त्रालंकार शोड्षोपचार पूजा पार पडल्यानंतर धूपारती अंगारा काढण्यात येणार आहे. यावर्षी या नवरात्र महोत्सवातील धार्मिक सोहळ्याचे यजमानपद भोपे पुजारी मंडळाकडे असून मातेच्या पितळी दरवाजासमोरील ओवरीमध्ये शाकंभरी देवीची प्रतिमा स्थापना करून यजमान अजित किसनराव परमेश्वर यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होऊन शाकंभरी नवरात्र महोत्सवास प्रारंभ होईल. त्यानंतर नवरात्रोत्सव काळात अनुष्ठानासाठी ब्रह्मवृंदांना वर्णी देण्यात येणार आहे.