Wed, Apr 24, 2019 08:29होमपेज › Marathwada › त्रिमूर्ती स्टॉक प्लाय कारखाना भंगारात

त्रिमूर्ती स्टॉक प्लाय कारखाना भंगारात

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 20 2018 11:01PMवसमत : इस्माईल जहागीरदार

आशिया खंडातील पहिला सहकारी प्लायऊड निर्मिती  ओळख असलेला माळवटा येथील त्रिमूर्ती स्टॉक प्लाय प्रकल्प राजकीय वादात सन 2005 मध्ये बंद पडला. तेव्हा पासुन आज पर्यंत प्रकल्प चोरट्यांसाठी कुरण बनला आहे. चालू स्थितीत असलेल्या कारखान्याची आज अवस्था भंगारात झाली असून कोट्यवधीचे साहित्य गायब आहे. दशकानंतर त्रिमूर्ती स्टॉक प्लाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

वसमत तालुक्यातील माळवटा एमआयडीसी भागात आशिया खंडातील पहिला प्लायवूड प्रकल्प 1991 साली स्थापन करण्यात आला होता. प्रकल्पात कापसाच्या पराटी  व बग्यासपासून प्लायवूड तयार करण्यात येणार होते. प्रकल्पासाठी प्रथम 29 कोटींच्या निधीची उभारणी केली होती. प्रकल्प रखडल्याने वाढीव प्रकल्प अहवाल 48 कोटींवर गेला होता. निधी खर्च करून सन 2000 मध्ये स्टॉक प्लाय चालू करण्यात आला होता.

सन 2000 ते 2005 पर्यंत प्रकल्प चालू होता. या दरम्यान उत्पादनही झाले, प्रकल्पात एकूण 8911 सभासदांचे मोठ्या प्रमाणात भाग भांडवल आहे. त्रिमूर्ती स्टॉक प्लाय प्रकल्पास अखेर सन 2005 मध्ये राजकीय वादाचे ग्रहण लागल्याने बहुमत असतानादेखील अध्यक्षांसह 17 संचालकानी राजीनामे दिले होते. कारखान्यावर अवसायक म्हणून सहायक निबंधकांची नियुक्ती झाली. बंद पडलेल्या कारखान्याकडे कोणीच पाहिले नसल्याने कारखाना चोरट्यांचे कुरण बनले. कारखाना देखरेखीसाठी वॉचमन नसल्याने येथील भंगार चोरट्यांच्या मर्जीवर लंपास होत आहे.

त्रिमूर्ती स्टॉकप्लाय कारखान्यास भविष्यनिर्वाह निधी कार्यालय औरंगाबाद यांनी सील ठोकले आहे. सन 2011 मध्ये कारखान्यातील  19 लाख रुपयांचे मशनरी व साहित्य चोरून नेताना पोलिसांनी जाग्यावरच ट्रक व आरोपी पकडले होते. सदरील प्रकरण न्यायलयीन आहे.महाराष्ट्रातील प्लायवूडचा पहिला 48 कोटी रुपये निधी खर्च करून उभारलेला प्रकल्पावर सध्या 100 कोटींवर कर्ज  गेले आहे. कारखान्यातील मशनरी मोटार अनेक विभागातील साहित्य विविध, पार्ट  भंगार चोरट्यानी धुऊन काढल्याने सध्या नुसता सांगाडा उभा असल्याचे चित्र आहे. 

कारखान्याच्या देखरेखीसाठी वॉचमन ठेवण्यासंदर्भात अनेक वेळा लेखी देऊन संबंधितांकडे मागणी केली होती. कारखान्यातील मशनरी, विविध साहित्य, अनेक पार्ट गायब झाले आहे. राजकीय वादाने वसमत तालुक्यातील प्रकल्प बंद पडला असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया कारखान्याचे प्रभारी एम डी शिवदास रामनगिरे यांनी दिली.त्रिमुर्ती स्टॉकप्लाय कारखान्या  संदर्भात पुर्ण माहीती घेत अहवाल तयार करुन शासनास लवकरच माहीती पाठविण्यात येणार आहे अशी प्रतिक्रीया सहाय्यक निबंधक अधिकारी किशन फिस्के यांनी दिली.