Wed, Jul 17, 2019 08:43होमपेज › Marathwada › अंबाजोगाई तालुक्यातील वृक्ष लागवडीचे टार्गेट अपूर्ण 

अंबाजोगाई तालुक्यातील वृक्ष लागवडीचे टार्गेट अपूर्ण 

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 16 2018 10:15PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

शासनाने मोठे ध्येय समोर ठेवून प्रत्येक तालुक्यास वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले आहे, मात्र अंबाजोगाई तालुक्यातील शासकीय कार्यालयांनी केवळ 60 टक्केच आपले टार्गेट पूर्ण केले आहे. काही कार्यालये वृक्ष लागवडीसाठी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. सामाजिक वनीकरण विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.तालुक्याला वृक्ष लागवडीचे मिळालेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी रोपे तयार करण्याची जवाबदारी सामाजिक वनीकरण विभागाची असताना वनअधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे वृक्षलागवडीसाठी लागणारी रोपे तयार झाली नाहीत असा आरोप तालुक्यातील सरपंचानी केला आहे. दौर्‍याच्या नावाने सतत अधिकारी व कर्मचारी दांड्या मारत असल्याने कार्यालयात एक कारकून व एक शिपाया व्यतिरिक्त कर्मचारी नसल्याने कार्यालयाचा पूर्ण भार शिपायावर असतो वृक्ष लागवडीकडे वन अधिकार्‍याचे दुर्लक्ष झाल्याने योजना बारगळण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. 

तालुक्याला वृक्षलागवडीचे दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण खात्याचे कर्मचारी अधिकारी नर्सरी मध्ये रोप तयार करतात. शासन त्यावर करोडो रुपये खर्च करते रोपे मात्र कमी वयाचे असल्याने लागवड होताच आठ दिवसांत जागेवर जळून जात आहेत. वन विभाग व सामाजिक वणीकरणाचे अधिकारी नर्सरीच्या आडून शासनाला लुटण्याचे काम करत असल्याने याची चौकशी व्हावी अशी नागरिकातून मागणी पुढे येत आहे. सामाजिक वनीकरण विभागा मार्फत गेल्या वर्षी तेलघना फाटा ते तेलघना गावा पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लागवड केली. यावर्षी  पाहिले तर एकही रोपटे दिसत नाही. तिच अवस्था घाटनांदूरच्या रेल्वेच्या पटरीच्या बाजूने गेल्यावर्षी खड्डे खोदून झाडे लावली होती.

तेच खड्डे रिकामी झाल्याने मजुरांमार्फत त्या जागेवर वृक्ष लागवड एमआरईजीएस मार्फत पुन्हा तिथेच करत असल्याने हा शासनाला लुटण्याचा प्रकार नव्हे तर काय? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. वर्षभर एकही झाड जगले नाही याला कोणते वनीकरण म्हणावे असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. वाघाळा रोड तसेच गावापर्यंत जाणारा रस्त्याच्या बाजूला एवढे लहान झाडे लावली आहेत की अजून दोन दिवस पाऊस पडला नाही तर ही रोपे जागेवर जळून जाण्याची भीती असल्याचे वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी चिंता व्यक्त केली आहे.  

एक लाखाचे टार्गेट

पंचायत समितीच्यावतीने शासकीय कार्यालये व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती एक लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले गेले होते. त्यापैकी 66 हजार 670 झाडे लावली गेली. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने 18300, महिला व बालविकास विभागाने 700, प्राथमिक आरोग्य केंद्र 293 पशुसंवर्धन विभाग 140 उप अभियंता विभागास 5000 दिले होते त्यापैकी फक्त 410 झाडे लावण्यात आली. पाटबंधारे उपअभियंता कार्यालयाने 327 झाडे लावली.