Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Marathwada ›  बालरोग कक्षात 168 बालकांवर उपचार 

 बालरोग कक्षात 168 बालकांवर उपचार 

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 2:12AMपरभणी : प्रतिनिधी 

कुपोषणग्रस्त बालकांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात कुपोषीत बालरोग कक्ष सुरू केला आहे. यात अत्याधुनिक सुविधा असून बालकांवर विविध पध्दतींने उपचार करण्यात येतो. यामुळे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचे प्रमाण वाढत आहे. या कक्षात वर्षाअखेरपर्यंत तब्बल 168 बालकांवर परिणामकारक उपचार करण्यात आले आहेत. 

जुन्या प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील बाजूस दुसर्‍या मजल्यावर नवीन इमारतीत कुपोषण कक्ष आहे. 10 खाटांच्या या कक्षात सद्यःस्थितीला 7 कुपोषीत बालरुग्ण उपचार घेत आहेत. एप्रील 2017 पासून आतापर्यंत 168 रुग्णांवर परिणामकारक उपचार झाले आहेत. येथे चौदा प्रकारच्या पध्दतींचा वापर रुग्ण व पालकांशी संवाद व समुपदेशनासाठी केला जातो. कक्षात कॉन्सिलिंग रूम ,प्लेरूमध्ये  दहा ते पंधरा प्रकारचे खेळणे आहेत. गालफुगी, गोवरच्या रुग्णबालकांसाठी येथे वेगळी व्यवस्था केलेली आहे. किचनहॉल व अद्यावत असे नर्सिंग सेंटरही सुरू करण्यात येणार आहे.  3 स्टाफनर्स व एक वैद्यकीय अधिकारी असे चार महत्त्वाची पदे तर अन्य काही कर्मचारी कक्षात कर्तव्य बजावत आहेत.  कुपोषणाने त्रस्त बालकांवर उपचार करून त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी हा कक्ष प्रयत्नशील आहे.  शासनाच्या कुपोषणविषयक  आरोग्य सुविधा कुपोषणग्रस्तांना मिळवून देणे या कक्षातील अधिकार्‍यांचे काम आहे. मातांना समुपदेशीत करून बालकांच्या कुपोषणावर घरगुती उपाय योजना करण्याचे तंत्र सांगण्यात येते.  कुपोषितपणामुळे बालपण हरवलेल्या बालकांना आनंद देण्याचा यशस्वी प्रयत्न या कक्षात करण्यात येतो. अत्यंत खेळी-मेळीत उपचार करण्यात आल्याने बालकांच्या शारीरिक प्रकृतीत सुधारणा होत आहे.  

महिलांना येथे 14 दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून गरम पाणी व पिण्याचे शुध्द पाण्यासाठी फिल्टर बसविण्यात आले आहेत. कुपोषितांसाठी कार्टूनच्या बेडसीट, मनोरंजनासाठी टीव्हीची व्यवस्था करण्यात आली. सर्वसोयी सुविधांयुक्त असे कक्ष कुपोषणातुन मुक्त करण्यासाठी निर्माण करण्यात आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.