Fri, Apr 26, 2019 03:42होमपेज › Marathwada › आजपासून राज्यभरातील रेशन दुकानदार संपावर

आजपासून राज्यभरातील रेशन दुकानदार संपावर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी

तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील रेशन दुकानदारांना वेतन सुरू करा, यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदार आज रविवार, 1 एप्रिलपासून संपावर जात आहेत. यादरम्यान धान्य उचल व वितरण न करण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष, माजी खा. गजानन बाबर यांनी घेतला आहे. या संपात बीड जिल्ह्यातील सर्व दुकानदार सहभागी आहेत. राज्यातील रेशन दुकानदारांची वेतन सुरू करावे, ही जुनीच मागणी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रॉकेल कोट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कपात झाली आहे. त्यामुळे हॉकर्स व किरकोळ रॉकेल विक्रेते यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

यासाठी हॉकर्स व किरकोळ रॉकेल विक्रेते यांना गॅस वितरणाची परवानगी द्यावी, अशी संघटनेने मागणी केली आहे. तामिळनाडू राज्यात रेशन दुकानदारांना वेतन दिले जात आहे. असे वेतन महाराष्ट्रात द्यावे यासाठी आज रविवारपासून राज्यातील एक लाख स्वस्त धान्य दुकानदार व हॉकर्स संपावर जात असल्याची हाक माजी खा. गजानन बाबर यांनी दिली आहे. यानुसार बीड जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार संपावर जात असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष के. के. खान यांनी दिली आहे. 

मुंबईतील दुकानदारांचाही संप

याअगोदरही रेशन दुकानदारांनी संप केला होता. मात्र या संपामध्ये मुंबई, ठाणे येथील दुकानदारांनी फारसा सहभाग घेतला नव्हता. यावेळच्या संपात मात्र मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यातील रेशन दुकानदारांचा संपात सहभाग असल्याची माहिती माजी खा. गजानन बाबर यांनी दिली.

Tags : Solapur, Solapur News, Today, ration, shopkeeper, strike, state 


  •