Tue, Apr 23, 2019 13:46होमपेज › Marathwada › निपाहचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फळे खाताना सतर्कता बाळगावी

निपाहचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फळे खाताना सतर्कता बाळगावी

Published On: May 29 2018 1:36AM | Last Updated: May 28 2018 10:56PMपरभणी : प्रतिनिधी

सध्या देशभरात निपाह व्हायरसने थैमान घातले असून या विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणार्‍या वटवाघळांमार्फत होतो.त्यांनी खाल्‍लेली उष्टी फळे खाल्ल्याने विषाणूंची उत्पत्ती होते. या पार्श्‍वभूमीवर परभणी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वटवाघळांचे वास्तव्य असल्याने निपाहचे विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी फळे खाताना सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. 

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वडाच्या झाडावरही वटवाघळाचे मोठे वसतिस्थान आहे. या ठिकाणी जवळपास एक हजार ते दोन हजार एवढे शेपूटधारी वटवाघळे लटकलेली आहेत. दररोज रात्री जिल्ह्यातील जंगल परिक्षेत्रात भटकंती करून अन्न मिळविणारी ही वटवाघळे दिवसा या वडाच्या झाडावर येऊन लटकतात.

यामुळे या वटवाघळांनी खाल्लेल्या फळांपासून निपाहचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासह जिल्ह्यातील जांभुळबेट व गोदावरी नदीच्या काठावरील मोठमोठ्या झाडांवरही वटवाघळांची वसतिस्थाने आहेत. विहिरींमध्येही मोठ्या प्रमाणात वटवाघळे वास्तव्य करतात. शहरातील उंच उंच इमारती व इतर निर्मनुष्य ठिकाणी वटवाघळांचे वास्तव्य असल्याचे दिसून येते. 

मेंदूला ताप चढणे, थकवा जाणवणे, शुद्ध हरपणे, चक्‍कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे ही निपाहची लक्षणे आहेत. सद्यःस्थितीला या रोगवर औषध उपलब्ध नाही. पक्षी, प्राणी, विशेषतः वटवाघूळ व डुकराने खाल्लेली फळे खाल्याने हा रोग होतो. झाडाखाली पडलेली फळे व भाजीपाला अर्धवट खाल्लेली असल्यास ती खाणे टाळावे. रस्त्यावर विक्री करण्यात येणारी  कापलेली फळे, प्रक्रिया न केलेले खजूर खाल्ल्याने निपाहच्या व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे. 

निपाह टाळण्यासाठी हे करावे  :

फ्ल्यूसारखी लक्षणे असणार्‍यांनी तपासणी करावी, संसर्ग झालेल्या व्यक्‍तीने मास्क, टोपी, हातमोजे घालावेत. डुकरांच्या फार्मवरील कर्मचार्‍यांनी जखम, संसर्गावर उपचार घ्यावेत, पाणी उकळून प्यावे, विहिरीवर जाळी बसावी, वटवाघूळ अथवा इतर पक्षांना विहिरीत जाता येणार नाही, याची दक्षता घ्यावी.