Mon, Apr 22, 2019 12:19होमपेज › Marathwada › उपनिबंधकांच्या खुर्चीवर तूर फेकून आंदोलन

उपनिबंधकांच्या खुर्चीवर तूर फेकून आंदोलन

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 14 2018 10:54PMपरभणी : प्रतिनिधी

चार महिन्यांपासून सुरू असलेल्या शासकीय तूर खरेदीची मुदत 15 मे रोजी संपत असल्याने संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत केंद्र बंद न करण्याच्या मागणीसाठी 14 मे रोजी दुपारी 1.30 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत जिल्हा उपनिबंधकांच्या रिकाम्या खुर्चीवर तसेच दालनात तूर फेकली. तूर खरेदी बंद केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 

जिल्ह्यात तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी 17 हजार 450 शेतकर्‍यांनी केलेली आहे. जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 4 हजार 376 शेतकर्‍यांची तूर खरेदी झाली आहे. अजून 10 हजार 74  शेतकर्‍यांकडील तूर शिल्‍लक आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या तुरीचा शेवटचा दाणाही खरेदी केला जाईल, असे सांगितले आहे आणि दुसरीकडे 15 मेपासून तुरीची खरेदी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. यामुळे शासनाने तूर खरेदीची मुदत वाढवावी व नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्‍यांची तूर खरेदी करावी अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, दिगांबर पवार, मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, युवा जिल्हाध्यक्ष शेख जाफर, केशव आरमाळ, रामेश्‍वर आवरगंड, गजानन गरूड, रामकिशन गरूड, बालासाहेब ढगे, बालाजी मोहिते आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेली 5 किलो तूर जिल्हा उपनिबंधकांच्या खुर्चीवर तसेच दालनात फेकून निषेध केला. यावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात हजर नव्हते. आंदोलनकर्त्यांशी सहायक निबंधक मुकुंद पाठक यांनी चर्चा केली. त्यावर कार्यकर्त्यांनी 4 महिन्यांत केवळ 4 हजार शेतकर्‍यांची तूर खरेदी कशी काय झाली? जिल्ह्यात 13 हजार शेतकर्‍यांच्या घरात तूर पडून आहे. त्याचे काय करायचे? संपूर्ण तुरीची खरेदी करा, अशी आग्रही मागणी करीत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक माधव यादव हेदेखील उपस्थित होते.