होमपेज › Marathwada › खासगी सावकाराच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप

खासगी सावकाराच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप

Published On: Jan 18 2018 9:09PM | Last Updated: Jan 18 2018 9:09PMबीडः प्रतिनिधी

व्याजाने दिलेले पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावणार्‍या  खासगी सावकारचा तिघांनी निघृणपणे खून केल्याचे सिद्ध झाल्याने या प्रकरणीतील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हनुमंत हौसाराव कवचाळे, अजित महादेव इथापे  आणि आमीर भैय्या सय्यद अशी शिक्षा सुनावलेल्‍यांची नावे आहेत. अतिरिक्‍त जिल्हा व सत्र गुरुवारी सुनावली. 

बाळासाहेब मारोती चव्हाण ( रा. पिंपरखेड ता. आष्टी) असे त्या खून करण्यात आलेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. बाळासाहेब चव्हाण यांचा भूसा विक्रीसह खासगी सावकारीचा व्यवसाय  होता. त्यांच्याकडून आरोपी अजित महादेव इथापे व गजानन बलभीम चव्हाण यांनी व्याजाने पैसे घेतले होते. पैसे परत येत नसल्यामुळे चव्हाण यांनी दोघांकडे तगादा लावला होता. त्यामुळे इथापे व चव्हाण यांनी बाळासाहेब यांना जीवे मारण्याचा कट रचला. तसेच हनुमंत कवचाळे यास त्याच्या स्कॉर्पिओ गाडीसह कटामध्ये सहभागी करुन घेतले. 

१० जानेवारी २०१६ रोजी, अजित इथापे याच्या मालकीच्या चिंचोली फाटा येथील शेतात सर्वजण एकत्र आले. तेथून बाळासाहेब चव्हाण यांना जेवणास बोलाविले. तसेच भूसा खरेदी करायचा असल्याचेही त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर हनुमंत कवचाळे याने चव्हाण यांना दुचाकीवरुन कर्जत तालुक्यातील डोंबाळावाडी येथे नेले. त्यानंतर आरोपी अजित व आमीर हे दोघे हनुमंतची स्कॉर्पिओ घेऊन त्यांच्या मागे गेले. कर्जत येथे जाऊन चौघे एकत्र झाले. त्या पैकी तिघांनी कर्जत येथून दारु खरेदी करुन देमनवाडी येथील शिवारात चौघांनी दारु पिली. त्यानंतर तिघांनी बाळासाहेब चव्हाण यांना दगडाने मारहाण केली. ते मयत झाले असल्याचे समजून त्यांचे प्रेत घेऊन जाण्यासाठी स्कॉर्पिओ गाडी आणण्यास निघून गेले. परत आल्यावर सदर ठिकाणी मयत दिसला नाही. त्याचा शोध घेत पुढे गेले असता बाळासाहेब चव्हाण हे जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसल्याने त्यांना गाडीने धडक देऊन ठार मारले. त्यानंतर वाहनात टाकून आणत असताना बाळासाहेब मयत झाला नाही याची खात्री व्हावी म्हणून पुन्हा गाडीच्या सीटबेल्टने गळा आवळून त्यांचे प्रेत वाकी शिवारात आणून टाक ले. त्यांची मोटार सायकाल शेजारी टाकून अपघाताचा बनाव करुन निघून गेले.  या प्रकरणी मयताचा भाऊ सतिष चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन  हनुमंत हौसाराव कवचाळे (रा. शिरपूर),  अजित महादेव इथापे (रा.चिंचोली) व आमीर भैय्या सय्यद (रा. शिरपूर) व गजाजन बलभीम चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 

या प्रकरणाचा तपास आष्टी ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरिक्षक दिनेश आहेर व एपीआय हमीद शेख यांनी केला.  सरकारी पक्षाच्यावतीने एकुण २२ साक्षिदार तपासण्यात आले. सरकारी वकिल अजय राख यांचा युक्‍तीवाद ग्राह्य धरत आरोपी हनुमंत हौसाराव कवचाळे, अजित महादेव इथापे  व आमीर भैय्या सय्यद यांना अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्या. बी.व्ही. वाघ यांनी जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड सूनावला. या प्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील मिलिंद वाघीरकर व इतरांचे सहकार्य लाभले.