Fri, Jul 19, 2019 05:05होमपेज › Marathwada › तीन दिवस होणार हजारो वारकर्‍यांची सेवा

तीन दिवस होणार हजारो वारकर्‍यांची सेवा

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 22 2018 11:09PMबीड : प्रतिनिधी

पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन घेवून आषाढी वारी पूर्ण केल्याचे पुण्य पदरात पाडून गावी परतणार्‍या हजारो वारकर्‍यांच्या सेवेसाठी बीडमध्ये गेल्या तब्बल तेरा वर्षापासून अन्नदानाचा महायज्ञ सुरू केला जातो. यंदाही वारकर्‍यांच्या या सेवेसाठी बीडमधील वारकरी सेवा प्रतिष्ठानकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज ,23 जुलै रोजी या उपक्रमाला सुरुवात होणार असून पुढे दोन दिवस दररोज सायंकाळी 7 ते पहाटे 6 या वेळेत वारकर्‍यांची आरोग्य तपासणी व त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली जाणार आहे.

आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक मजल दर मजल करत पायी दिंडी आणि पालखी सोहळ्यातून पंढरीमध्ये दाखल होतात. या वारकर्‍यांची पंढरीकडे पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी अनेक गावचे ग्रामस्थ, सेवाभावी सामाजिक संस्थांकडून अन्नदानापासून आरोग्य तपासणीपर्यंत सेवा केली जाते. वारी पूर्ण केल्यानंतर हजारो वारकरी एस. टी. बससह मिळेल त्या वाहनाने गावी परतत असतात. अनेकवेळा रात्री मध्यरात्री या वारकर्‍यांना बसस्थानकात थांबावे लागते. रात्रीच्या वेळी बसस्थानकात त्यांची कसलीही व्यवस्था होत नाही. हाच धागा पकडत बीड येथील विविध वृत्तपत्रांत प्रिंटिंग ऑफसेट विभागात काम करणार्‍या ऑपरेटर, व कर्मचार्‍यांनी एकत्र येत गत तेरा वर्षापूर्वी म्हणजेच सन 2005 साली वारकर्‍यांची ही अडचण लक्षात घेऊन त्यांची सेवा करणार्‍या मनोदय एकमेकांसमोर व्यक्त केला आणि हा संकल्प सर्वांच्या सहकार्यातून प्रत्यक्षात साकारलाही.

आषाढी एकादशीपासून पुढे दोन दिवस दररोज सायंकाळी 7 ते पहाटे 5 यावेळेत बसस्थानकाच्या परिसरात वारकर्‍यांसाठी चहा पाणी, अल्पोहार व आरोग्य तपासणी हा उपक्रम राबवयचे ठरले. बसस्थानकातील कर्मचारी, पार्सल ऑफीसचे कर्मचारी, भारवाहक, बसस्थानकात कर्तव्यावर असणारे पोलिस कर्मचारी, टॅक्सी चालक, सामाजिक कार्यकर्ते, स्टॉल धारक, बीडच्या मोंढ्यातील व्यापारी या सार्‍यांनी या अन्न छत्रासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले. त्यामुळे हा उपक्रम उत्तरोत्तर व्यापक चळवळ बनत गेला.