होमपेज › Marathwada › तूर उघड्यावर पडून

तूर उघड्यावर पडून

Published On: Mar 04 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 12:15AMबीड : प्रतिनिधी

नाफेडच्या वतीने खरेदी केलेली तूर ठेवण्यास जागाच नसल्याने तूर खरेदी बंद करण्याची वेळ बीड येथील खरेदी केंद्रावर आली आहे. येथे हजारो क्विंटल तूर उघड्यावर पडून असल्याने अवकाळी पाऊस झाल्यास तूर भिजण्याचा धोका आहे. तर, दुसरीकडे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या परिस्थितीचा फायदा खुल्या बाजारातील व्यापारी घेण्याची भीतीही वाढली आहे. बीड जिल्ह्यता गतवर्षीही चार लाख क्विंटलवर तूर खरेदी करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी तूर डाळीचे वाढलेले दर, तुरीला मिळत असलेला चांगला भाव व सरकारने केलेले आवाहन यामुळे तुरीचा पेरा वाढला होता.  

शासकीय खरेदी जिल्ह्यात बारा केंद्रावर झाली आहे. शासकीय खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असली तरी खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याने अधिकार्‍यासमोरही पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे बीड येथील तूर औरंगाबाद, जालना, परतूर, अहमदनगर, बार्शी अशा ठिकाणी गोदाममध्ये साठविली जात आहे. मात्र, तिकडेही गोदामात जागा नसल्याने तूर खरेदीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
बीड येथील केंद्रावर साडेचार हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. यातील मोठ्या प्रमाणावर तूर खरेदी केंद्रावरच पडून आहे.

 ठेवण्यासाठी गोदामात जागा शिल्‍लक नसल्याने बीड येथे तूर खरेदी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या खरेदी बंदचा फायदा काही व्यापारी घेत आहेत. नाफेडतर्फे साडेपाच हजार रुपये क्विंटलने तूर खरेदी होत असली तरी खुल्या बाजारात तूर साडेचार हजार रुपये क्विंटलने खरेदी होत आहे. केंद्र सुरू नसल्याने शेतकर्‍यांना खुल्या बाजारात तूर विक्री करावी लागणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसणार आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतरही काही केंद्रावर होऊ घातली आहे. त्यामुळे तूर खरेदी करून वेळेवर पैसे देण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.