Thu, Jul 18, 2019 02:50होमपेज › Marathwada › व्हरकटवाडीत एकजुटीनं पेटलं रान..!

व्हरकटवाडीत एकजुटीनं पेटलं रान..!

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:18PMदिंद्रूड : बंडू खांडेकर

सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेने गावागावात तुफान आले आहे. सोमवारच्या (दि.8) मध्यरात्रीपासून व्हरकटवाडी ग्रामस्थांनी एकमताने श्रमदानास सुरुवात केली असून एकजुटीनं रान पेटलं आहे. सेव्ह इंडियन फार्मर ऑफ अमेरिकेच्या पदाधिकार्‍यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांचे मनोबल वाढण्यासाठी आर्थिक मदत केल्यामुळे गावकर्‍यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

दिंद्रूड येथून जवळच असलेले व्हरकटवाडी (ता. धारूर) हे गाव सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभागी झाले आहे. बालाघाटच्या पर्वत रांगेत दुर्गम भागातील केवळ 1000 लोकसंख्या असलेले हे छोटेसे खेडेगाव. या गावातील ग्रामस्थांनी श्रमदानाद्वारे साडेचार हजार घनमीटर तर मशीनद्वारे दीड लाख घनमीटर खोदकाम करण्याचा निर्धार केला आहे. प्रभावी जलसिंचन होण्यासाठी शिवारात नियोजनबद्ध खोदकाम करण्यात येणार आहे. सोमवारच्या मध्यरात्री नागरिकांनी गावालगतच्या डोंगरावर श्रमदानाचा शुभारंभ केला. पुढील दीड महिन्यात होणार्‍या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत विजयी होण्यासाठी आपापसातील मतभेद बाजुला सारत एकजुटीनं श्रमदान करण्याचा संकल्प गावकर्‍यांनी केला आहे. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेसाठी व व्हरकटवाडी शिवारात जलसिंचन चळवळ प्रभावीपणे राबवण्यासाठी सेव्ह इंडियन फार्मर ऑफ अमेरिका या सामाजिक संस्था तसेच विवेकवाडी परिवार डोंबिवली व ज्ञानप्रबोधिनी यांच्याकडून 100 तास पोकलेन आणि 250 तास जेसीबी काम करेल इतके अर्थ सहाय्य उपलब्ध झाले आहे.

Tags : Marathwada, There,  tornado,  village,  Satyamev Jayate, Water Cup