Mon, Jul 22, 2019 01:10होमपेज › Marathwada › कृषी, मंडळ अधिकार्‍यांविरोधात युवतीचा एल्गार

कृषी, मंडळ अधिकार्‍यांविरोधात युवतीचा एल्गार

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 14 2018 10:52PMपरभणी : प्रतिनिधी

कृषी विभागांमार्फत जलसंधारणाची कामे किती झाली आहेत, याची माहिती विचारण्यासाठी गेलेल्या एका युवतीस कृषी व मंडळ अधिकार्‍यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याची तक्रार आहे. याप्रकरणी सदरील कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी 21 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आलाआहे. 

पालम येथील मधु श्रावण पवार या युवतीने जलसंधारण विभागांतर्गत कृषी योजनेतून झालेल्या कामाच्या माहितीसाठी 12 एप्रिल रोजी कृषी अधिकारी अंबुलगेकर व मंडळ अधिकारी वाघमोडे यांना विचारणा करत अर्ज दिला; पण त्यांनी कोणतीही माहिती न देता उलट तिला अपशब्दाचा भडीमार करत अपमान केला. या अधिकार्‍यांनी जलसंधारण, कोरडवाहू अशा अनेक योजनांच्या कामात संगनमत करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कृषी अधिकार्‍यांना वरिष्ठांचा आशीर्वाद मिळत असल्याने पालम तालुक्यात या योजनांच्या कामाचा बोजवारा उडाला आहे.

या कार्यालयाविरोधात अनेकदा शेतकर्‍यांनी उपोषणे, खुर्चीला हार घालणे आदी आंदोलने केली; पण संबंधित अधिकार्‍यांवर कुठलाही चाप वरिष्ठांकडून अद्यापपर्यंत बसला नाही. यामुळे या भ्रष्टाचारात साखळी असल्याचा आरोपही या निवेदनात केला आहे. एखादी महिला विचारणा करण्यास गेल्यास तिला अपमानीत केल्या जाते. अशा बेजबाबदार अधिकार्‍यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 21 मे रोजी उपोषण करण्याचा निर्धार मधु पवार यांनी केला आहे. यापूर्वीच जिल्हाधिकारी यांनी तत्काळ एका समितीची नेमणूक करून सदरील कामांची योग्य ती सखोल चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे.