होमपेज › Marathwada › उमेदवाराची माघार ही तर राष्ट्रवादीची अगतिकता : पंकजा मुंडे

उमेदवाराची माघार ही तर राष्ट्रवादीची अगतिकता : पंकजा मुंडे

Published On: May 07 2018 9:51PM | Last Updated: May 07 2018 9:49PMपरळी वैजनाथ  : प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील उमेदवाराने ऐनवेळी माघार घेणे ही तर राष्ट्रवादी काँग्रेसची अगतिकता असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री नामदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हे नेतेच पवार साहेबांच्या पक्षाची वाताहत केल्याशिवाय राहणार नाहीत असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीमधील पवार घराण्याचा लॉयल लोकांवर अन्याय होतो व अपमानास्पद वागणूक मिळते त्याचेच फलित म्हणजे सुरेश धस आमच्या बरोबर आहेत असेही त्या म्हणाल्या.

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार व आमचे बंधू रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतली. राजकारणाच्या इतिहासात असं कधीच झालं नाही. अधिकृत उमेदवार माघार घेतो ही राष्ट्रवादीची अगतिकता आहे. त्यातही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आश्चर्यचकित करणारा आहे असे सांगून आता आम्ही पुढच्या तयारीला लागलो आहोत आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही ताकत लावू असेही ना. पंकजा मुंडे म्हणाल्या.