Sun, Mar 24, 2019 06:14होमपेज › Marathwada › मांजरा धरणातील पाणीप्रश्‍नी दाद मागणार 

मांजरा धरणातील पाणीप्रश्‍नी दाद मागणार 

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:26PMआडस : प्रतिनिधी

मांजरा धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी बैठक घेण्यात आली होती, मात्र या बैठकीची माहिती सदस्यांना देण्यात आली नाही.  मांजरा धरणातील पाणी नदी पात्रात सोडल्याने हे पाणी कर्नाटक राज्यात गेल्याने आपण या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी सांगितले आहे. 

बीड-उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीतील धनेगाव येथील मांजरा धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी 29 मार्च रोजी घेण्यात आलेल्या बैठकीची माहिती समितीवरील सदस्यांना दिली नाही. कागदोपत्री बैठक घेत धनेगाव धरणातील पाणी कॅनाल मधून सोडण्या ऐवजी नदीपात्रात सोडून ते पाणी कर्नाटक राज्याच्या हद्दी पर्यंत सोडण्यात आल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला. शेतकर्‍यांसाठी पाणी सोडण्यास आपला विरोध नाही, मात्र चुकीच्या पद्धतीने नदीपात्रात पाणी सोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या अगोदरह 2011 मध्ये मांजरा धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते.

मांजरा धरण गेली तीन वर्षे दुष्काळी परिस्थितीने कोरडेठाक पडले होते. त्यात गेल्या वर्षी झालेल्या पावसाने धरण भरले मात्र दिवसेंदिवस वातावरणात होत असलेल्या बदलाने पाऊस वेळेवर न झाल्यास धरणात पाणीसाठा राखीव पाणीसाठ्या पेक्षा अधिक पाणी शिल्लक ठेवण्याची गरज आहे.धरणातील पाणीसाठा नदीपात्रात सोडल्या नंतर ऐनवेळी पूर्वीप्रमाणेे परिस्थिती निर्माण झाली तर पाणी आणायचे कोठून असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा पाणीवाटप समितीचे सदस्य बजरंग सोनवणे यांनी केला आहे. कागदपत्री बैठक घेत नदीपात्रात धरणातील पाणी सोडल्या प्रकरणी न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

Tags : Marathwada, water, demand,  Manjara dam