Thu, Apr 25, 2019 07:37होमपेज › Marathwada › वॉटरकपमुळे गावकर्‍यांमध्ये निर्माण झाली एकी

वॉटरकपमुळे गावकर्‍यांमध्ये निर्माण झाली एकी

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:12PMआष्टी : सचिन रानडे 

गावातील मतभेद, राजकीय सुंदोपसुंदी, भावकीतील वाद हे सर्व गावच्या वेशीला टांगत गावासाठी आणि भविष्यातील आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची इर्षा मनात बाळगून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावात एकी निर्माण करत गाव एकत्र आले तर काहीही करू शकते हा विश्‍वास देत तालुक्यातील अनेक गावांना यात सहभागी होण्यास भाग पाडणार्‍या वाँटरकप स्पर्धेने तालुक्यातील गावच्या गावे एकत्र केली आहेत.

एके काळी आष्टी तालुका केवळ राजकारणाचा तालुका आणि तालुक्यातील राजकारणी या चौकटीतच मोडला गेला. त्यामुळे प्रत्येक गावागावात सर्वच राजकीय पक्षांनी आपले बस्तान चांगल्या परीने बसविले. निवडणुकीला कोणत्या गावचा उमेदवार असू शकतो आणि त्याला कोण हरवू शकतो याचा तंतोतंत हिशोबच गावकरी करीत बसत. त्यामुळे पिढान्पिढ्या चालत आलेल्या राजकीय पार्श्‍वभूमीने गावच्या गाव विनाकाम पळत असायचे. याचाच फायदा मग तालुक्यातील बड्या राजकारण्यांना आपली पोळी भाजून घेण्यात धन्यता वाटायची. यामुळेच मग भावकीतील वाद देखील चव्हाट्यावर यायचा.  गेल्या तीन महिन्यांत असे काय चक्र फिरले पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील मतभेद, राजकीय सुंदोपसुंदी, भावकीतील वाद हे जणू संपुष्टात आले आणि एकीचे बळ गावासाठी काय करू शकते हे दाखविण्यासाठी गावागावांत जणू स्पर्धाच लागली. एकमेकांचे पाय खेचणारे गावातील नेते, हेवेदावे विसरून या वॉटरकप स्पर्धेत दिवसरात्र श्रमदान करू लागले. मात्र यात मोठ्या राजकीय नेत्यांची गोची झाली हे ही तितकेच खरे.

ग्रामस्थांचे मनसंधारण

जलसंधारणाद्वारे गावकर्‍यांत मनसंधारण होऊ शकते आणि हे केवळ 45 दिवसांच्या श्रमदानाने शक्य होत असल्याने यामुळे गावची एकी दिसून तर येतेच शिवाय कोणकोणाचा विरोधक हे विसरून गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द ठेवतो, याची शिकवण म्हणजे ही वॉटरकप स्पर्धा असून यातून जलसंधारणाबरोबरच मनसंधारणही होत आहे असे मत सराटेवडगाव/आनंदवाडीचे सरपंच प्रा. राम बोडखे यांनी सांगितले.

 

Tags : beed, beed news, Water cup,  villagers together,