Sat, Jul 20, 2019 14:57होमपेज › Marathwada › परभणीतील गौतमनगरात १९५८ पासून भीमजयंतीची परंपरा

परभणीतील गौतमनगरात १९५८ पासून भीमजयंतीची परंपरा

Published On: Apr 14 2018 1:52AM | Last Updated: Apr 14 2018 1:47AMपरभणी : दिलीप माने

परभणी शहरात  भीमजयंती ही मागील 60 वर्षांपासून साजरी केल्या जाते. सर्वप्रथम 1958 साली ती साजरी झाली. शहरातील सर्वांत जुनी बौध्द वसाहत असलेल्या गौतमनगर येथून काढण्यात आलेली पहिली भीमजयंती हीच जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेची प्रेरणा आहे. तेव्हापासून अद्यापपर्यंत जिल्ह्यात भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते. 

महामानव विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण विश्‍वात मोठ्या उत्साहात साजरी होते. 14 एप्रिल 1891 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू गावी झाला. दलित-बहुजनांच्या जीवनाला अर्थप्राप्‍त करून देणारा तेजस्वी हिरा जन्मास आल्याने उपेक्षितांच्या जीवनात प्रकाश पडला. अख्खे आयुष्यभर कठोर परिश्रम करून दिन-दलित बहुजन समाजाला विकासाचा, प्रगतीचा शिका-संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र ज्यांनी दिला त्या डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्मोत्सव भीमजयंती म्हणून साजरा केला जातो. 

परभणीतील गौतमनगरात 1958 साली पहिली भीमजयंती साजरी झाली.  जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा प्रशासन प्रमुखांच्या हस्ते करण्याची पध्दत तेव्हापासून अद्याप सुरू आहे.  शासकीय अधिकारी असल्याने त्यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात यायचे.  पण एकावर्षी मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी जे.डी.जाधव यांनी पंचरंगी ध्वजाऐवजी निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्याची अपेक्षा व्यक्‍त करुन सर्वप्रथम निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण केले.14  एप्रिल 1958 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती साजरी करताना तत्कालीन आयोजकांनी डॉ.आंबेडकरांची जयंती  आदर्श पध्दतीने साजरी करून भावी पिढीसाठी एक आदर्श निर्माण करून ठेवला.

शहरात गौतमनगर, भीमनगर, नागसेननगर या वसाहतींमधील लोक एकत्रीत येऊन जयंती साजरी केली. गौतमनगरातील सुभेदार सभागृहात भव्यदिव्य मंडप टाकून, फुलांच्या माळा अन् रांगोळी पथकांनी परिसराला सजविण्यात यायचे. प्रबोधनीय, सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धा, व्याख्याने, भीमगीत गायनाचे कार्यक्रम आयोजित केल्या जात होते. या उत्सवासाठी डॉ.आंबेडकर यांचे पुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळीनी येऊन जयंती दिनी समाजाला मार्गदर्शन केले. पहिल्या जयंतीची मिरवणूक सजवलेल्या बैलगाडीतून काढण्यात आली होती. 

पावित्र्य समजून उत्सव साजरा व्हावा  

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले दैवत आहे. त्यांचा जन्मोत्सव साजरा करताना अनुचित प्रकार टाळावेत. बाबासाहेबांच्या विचारांचा,त्यांच्या कार्याचा जयघोष करून उत्सव साजरा करावा. पूर्वीचे लोक श्रध्दावान होते. केवळ नाममात्र लोकवर्गणीतून जयंती साजरी करायचे.सद्यःस्थितीला स्वरूप बदलले आहे कारण स्वतःचे योगदान देणारांची संख्या समाजात कमी होत आहे. प्रबोधनीय कार्यक्रम व्हावेत. जयंती कार्यक्रम हा आपला जिवनआदर्श  समजून प्रत्येकाने ती साजरी करावी.   - बी.एच.सहजराव, सामाजिक कार्यकर्ते.  

 

Tags : Parbhani, Parbhani news, Gautam Nagar, Bhim Jayanti,