Tue, Jul 16, 2019 00:00होमपेज › Marathwada › वसमत शहरात पहाटेच्या सुमारास अचानक आग 

वसमत शहरात पहाटेच्या सुमारास अचानक आग 

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 11:48PMवसमत : प्रतिनिधी

वसमत शहरातील मामा चौक परिसरात असलेल्या जैस्वानी यांच्या घरास रविवारी (दि. 3) पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती. दरम्यान, मुस्लिम बांधव नमाज अदा करून जात असताना त्यांच्या निदर्शनास येताच. त्यांनी धाव घेत जैस्वानी कुटुंबाना घराबाहेर काढण्यास मदत करून तिघांचे प्राण वाचविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर आग विझविण्यासाठी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते.

शहरातील मामा चौक भागात राहणारे निहालचंद जैस्वानी यांच्या घरास रविवारी (दि. 3) पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी मुस्लिम बांधव शेख अलिमोद्दीन, शे. रफी यांच्यासह आदी जण सकाळीची नमाज अदा  करून जात असताना जैस्वानी यांच्या घराला लागलेली आग निदर्शनास येताच तत्काळ त्यांनी पहिल्या माळावर राहणारे जैस्वानी यांना जोरजोरात हाक देऊन खाली उतरण्यास मदत केल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, नगरसेवक सीताराम म्यानेवार यांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली असता ते हजर झाले. अग्निशामक दल वेळीच आल्याने आग विझविण्यास मोठी मदत झाली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशिद, फौजदार रूपाली कांबळे, राजू सिद्दिकी आदींनी भेट देऊन पाहणी केली. सदरील प्रकरणी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती. शहरात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना घडल्या आहेत. यात नागरिकांच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे अशा आगीच्या घटना घडू नये, यासाठी नगर परिषदेने आधुनिक पद्धतीने सज्ज असलेली अग्निशामकची यंत्रणा उभी करावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नये.