Tue, Mar 19, 2019 20:29होमपेज › Marathwada › सोनोग्राफी मशीन नसल्याने रुग्णांचे हाल

सोनोग्राफी मशीन नसल्याने रुग्णांचे हाल

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 10:46PMगेवराई : विनोद नरसाळे

गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन नसल्याने रुग्णांसह गरोदर महिलांचे मोठे हाल होत आहेत. तपासणीनंतर डॉक्टर सोनोग्राफी करण्यासाठी रुग्णांच्या हातात चिठ्ठी देत आहेत. परिणामी रुग्ण, गरोदर माता तसेच प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलांना खासगी केंद्रातून सोनोग्राफी करावी लागत आहे. त्यामुळे प्रसूतीच्या कळा असह्य होणार्‍या महिलांचे तर खूपच हाल होत आहेत. तसेच गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका सहन करण्याबरोबरच मनस्ताप देखील सहन करावा लागत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

गेवराई येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. येथे चांगली रुग्णसेवा मिळते म्हणून तालुक्यातील गावे, शिवाय लगतच्या अंबड, माजलगाव, शिरूर तालुक्यातील काही रुग्ण येथे येत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची गर्दी वाढली आहे. या रुग्णालयात रुग्ण संख्या मोठी आहे. दरमहा सरासरी सात ते आठ हजार रुग्ण उपचारासाठी येतात. प्रसूतीसाठी तालुक्यातून महिला मोठ्या प्रमाणात येतात. प्रसूतीपूर्व तपासण्याही कराव्या लागतात. शिवाय 50 खाटांचे रुग्णालय असल्याने दाखल करावयाच्या अनेक रुग्णांची सोनोग्राफी करावी लागते, मात्र रुग्णालयात सोनोग्राफी मशीन नसल्याने रुग्णांच्या हाती चिठ्ठी देऊन त्यांना खासगी केंद्रावर पाठविले जाते. त्यामुळे शहरात या खासगी केंद्राची संख्या कमी असल्याने याठिकाणी अव्वाची सव्वा फिस आकारुन लूट केली जात असल्याने गोरगरीब रुग्ण, गरोदर मातांना याचा मोठा फटका बसत आहे. 

रुग्णांची लुबाडणूक 

जिल्ह्यात स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी शासनाने खासगी सोनोग्राफी केंद्राची कडक तपासणी केली. त्यावेळी गेवराई शहरातील काही सोनोग्राफी केंद्र बंद झाली. त्यामुळे सोनोग्राफी केंद्रांची संख्या कमी असल्याने रुग्णांची लुबाडणूक होत आहे. त्यातच उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन नसल्याने खासगी केंद्राचा व्यवसाय वाढविण्याचा हा डाव असल्याची चर्चा रुग्ण सर्रास करतात. शहरात सध्या परवानाधारक खासगी 4 सोनोग्राफी केंद्र आहेत, त्यांना चांगली संधी सापडली आहे.

Tags : Marathwada, situation, patients, due,  lack,  sonography, machines