Tue, Mar 26, 2019 11:39होमपेज › Marathwada › शाळा बनू लागल्या मार्केटिंगचा अड्डा

शाळा बनू लागल्या मार्केटिंगचा अड्डा

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 16 2018 10:06PMबीड : प्रतिनिधी

काय आवश्यक, अनावश्यक आहे हे न कळण्याच्या वयात गोडगोड बोलून एखादी वस्तू माथी मारणार्‍या ‘सेल्समन’ची गाठ पडली तर साहजिकच ती वस्तू खरेदी करण्याचा मोह होतो. अगदी हीच बाब लक्षात घेऊन शाळांमधून पेन, पेन्सिल, मॅजीक स्लेट आणि इतर अनावश्यक बाबींची जाहिरात करून विक्री केली जात आहेत. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असून पाल्याच्या हट्टामुळे पालकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे.

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शाळेसाठी आवश्यक वस्तुंची खरेदी पालकांकडून केली जाते. पाठ्यपुस्तकेही हल्ली शाळेतच मिळू लागली आहेत. असे असताना शाळेतील मुलांनाच ‘ग्राहक’ बनवू पाहण्याचा प्रयत्न होत आहे. पेन, पेन्सिल, चित्रकलेची वही, मॅजीक स्लेट आणि लहान मुलांना आवडतील अशा काही इतर वस्तू घेऊन विक्रेते शाळेत पोहोचतात. मुख्याध्यापक, शिक्षकांची परवानगी घेऊन विक्रेत प्रत्येक वर्गात याची जाहिरात करतात. साहजिकच मुलांकडे आयत्या वेळी पैसे नसतात म्हणून एका दिवसाची मुदत दिली जाते. यादरम्यानच्या काळात मुलांमध्ये ‘मी घेणार’, ‘मी पैसे आणणार’ अशी चर्चा होते आणि घरी पोहोचताच पालकांकडे हट्ट धरला जातो. पाल्याच्या हट्टापायी वस्तुची उपयोगीता लक्षात न घेता पैसे दिले जातात आणि वस्तुची खरेदी होते. शाळेत शिक्षणाच्या संबंधीत वस्तुंचीच विक्री केली जात असली तरी त्या खरोखरच उपयोगी आहेत का, त्यांचा दर्जा काय आहे, या बाबी कोणीही लक्षात घेत नाही. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असून शिक्षण विभागाने यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

क्‍लासेसवालेही पोहोचले

शाळेमध्ये जाऊन विविध शैक्षणिक साहित्य विक्री करण्याबरोबरच काही ठिकाणी इंग्रजी, गणिताच्या स्पेशल बॅच घेऊ, विद्यार्थ्यांना सर्व विषयात पारांगत करू अशी जाहिरात करून विद्यार्थी मिळवण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडत आहेत. असे प्रकार बंद करण्यासाठी नियमांची अंमलबजावणी हवी.

इंग्रजी शाळांमध्ये प्रमाण अधिक

काही इंग्रजी शाळांमधून ठराविक दुकानातूनच गणवेश, दप्तर इतर साहित्य खरेदी करण्याचे सांगितले जाते. तर काही ठिकाणी थेट शाळेतच हे साहित्य पुरवले जाते. याच्या जोडीला बाहेरून येणार्‍या विक्रेत्यांनाही मोकळीक दिलेली असते. या सर्व प्रकाराने पालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

मुख्याध्यापकांनीच घ्यावा पुढाकार

वर्गात आणि शाळेच्या आवारात मुख्याध्यापकांच्या परवानगीशिवाय कोणीही येऊ शकत नाही. असे असताना विविध वस्तू विक्री करणारे हे विक्रेते थेट वर्गात जाऊन आपल्याकडील उत्पादनाविषयी मुलांना माहिती देतात. या वस्तू शैक्षणिक उपयोगी असल्या तरी त्याची आवश्यकता आहे का, त्यांचा दर्जा काय याबाबत विद्यार्थी आणि पालकही अनभिज्ञ असतात. केवळ वर्गातील मित्र घेणार आहेत, मलाही घ्यायचे आहे असा पाल्याचा हट्ट असतो. असे प्रकार बंद करण्यासाठी आता मुख्याध्यापकांनीच पुढाकार घ्यायला हवा.