Mon, Jun 24, 2019 21:34होमपेज › Marathwada › पाणीसाठा खालावल्याने टंचाई

पाणीसाठा खालावल्याने टंचाई

Published On: Apr 21 2018 1:02AM | Last Updated: Apr 20 2018 11:26PMबीड : प्रतिनिधी

उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. परिणामी छोटी धरणे कोरडीठाक पडली आहेत. माजलगाव व मांजरा या मोठ्या धरणामध्ये मात्र अर्ध्यावर पाणीसाठा आहे. लहान धरणे कोरडीठाक पडल्याने ग्रामीण भागात जनवरांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. 

बीड जिल्ह्यात गत दोन वषार्र्ंपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीटंचाई फारशी जाणवत नाही. यावर्षीही जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरली होती. आता मात्र उन्हाचा तडाखा वाढल्याने धरणातील पाणीसाठी झपाट्याने खालावू लागला आहे. 

जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाणी शेतकरी सध्या भाजीपाला, ऊस, फळबाग आदी पिकांसाठी वापरत आहेत. यामुळेही पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. आजघडीला मोठ्या धरणापैकी माजलगाव धरणात 36 टक्के व मांजरा धरणात 40 टक्के पाणीसाठा आहे. या धरणांची क्षमता मोठी असल्याने हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी मुबलक आहे. गतवर्षी याच धरणात यापेक्षा अधिक  पाणीसाठा यावेळी होता. 

बीड जिल्ह्यात 144 धरणे आहेत. यात दोन मोठे असून मध्यम व लहान प्रकल्प 142 आहेत. सध्या मध्यम प्रकल्पामध्ये 39 टक्के पाणीसाठा आहेत. तर, जिल्ह्यातील लघु प्रकल्पामध्ये केवळ 19 टक्के पाणीसाठा आहे. सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अद्याप जिल्ह्यात फारसे टँकर सुरू नसले तरी ग्रामस्थांकडून टँकरची मागणी वाढू लागली आहे. 

धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने व काही धरणे आटल्याने याचा विहिरी, बोअरच्या पाण्यावरही परिणाम झाला आहे. विहिरी, बोअरचे पाणी आटल्याने उन्हाळी पिकेही धोक्यात आली आहे. गहू, हरभरा ही पिके निघली असली तरी फळबाग, ऊस, भाजीपाला या पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात आता पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने अगामी काळात ही पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची भीती आहे.