Sun, May 26, 2019 21:36होमपेज › Marathwada › खिचडी उधारीवर; कामगार सलाईनवर 

खिचडी उधारीवर; कामगार सलाईनवर 

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 09 2018 11:51PMअंबाजोगाई : रवी मठपती 

शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शालेय पोषण आहार म्हणून खिचडी दिली जाते. खिचडी बनवून खाऊ घालण्यासाठी कामगारांची नियुक्ती शाळांमध्ये करण्यात आलेली आहे, परंतु गेल्या सहा महिन्यांपासून शालेय पोषण आहार कामगारांचे वेतन अद्याप दिलेच गेले नाही. त्यामुळे उधारीवर आणलेल्या किराणा सामानाची बाकी लाखो रुपयाच्या घरात झाली आहे.

शाळेमध्ये विद्यार्थी नियमित उपस्थित राहावेत. आरोग्य उत्तम असावे. उपाशी राहू नयेत. कुपोषण थांबावे. विद्यार्थी गळती थांबावी इत्यादी कारणांमुळे खिचडी, वरण भात, चिक्की, मटकी वगैरे शालेय पोषण आहार म्हणून विद्यार्थ्यांना दिले जाते. खिचडी बरोबर शिजली की नाही याची सरकारी अधिकारी वेळोवेळी तपासणी करतात. चुका अथवा कमी अधिक आढळून आल्यास संबंधित कामगारास व शालेय प्रशासनास धारेवर धरले जाते. किंबहुना कारवाई केली जाते. 

एकीकडे सरकार आपला उद्देश कामगारांकडून शंभर टक्के सफल करून घेत आहे, परंतु गोरगरीब कामगारांचे वेतन दर महिन्याला करत नाही अशी कामगारांची तक्रार आहे. काही शाळांमध्ये खिचडी शिजवण्यासाठी बचत गट काम करतात. खिचडी शिजवून खाऊ घालण्यासाठी प्रती कामगारास महिन्याकाठी अवघे एक हजार रुपये दिले जातात. अत्यल्प पैशातूनही ही लोकं खिचडी विनासायास शिजवतात.

खिचडी शिजवण्यासाठी नुसता तांदूळ असून भागत नाही तर त्यासाठी भाजीपाला, फळ भाज्या, किराणा साहित्य, गॅस सिलिंडर इत्यादींची तजवीज करावी लागते. किराणा साहित्य व भाजीपाला यासाठी खिचडी कामगारांनी उधारी लावली आहे. दुकानदारही विश्‍वासावर हजारो रुपयांचे सामान उधारीवर देतात, परंतु सहा महिने उधारी थकीत ठेवायचे दुकानदारास परवडत नसल्याकारणाने आता त्यांनी बाकी वसुलीसाठी तगादा लावला आहे. 

Tags : Marathwada, rest, groceries, borrowed, million, rupees.