Wed, Aug 21, 2019 15:04होमपेज › Marathwada › ४७ वर्षांनंतर नागपुरात होणार पावसाळी अधिवेशन

विधानभवन गजबजले

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 02 2018 11:31PMनागपूर : प्रतिनिधी

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या चार जुलैपासून येथे सुरू होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून विधानभवनात हालचालींना वेग आला आहे. एरव्ही वर्षभर निवांत असलेला विधानभवन परिसर आता गजबजलेला दिसतो आहे.

1960 साली महाराष्ट्राला विदर्भ जोडल्यानंतर दरवर्षी विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात व्हावे, असे नागपूर करारात नमूद होते. त्यानुसार दरवर्षी पावसाळी अधिवेशन नागपुरात होते. अपवादात्मक स्थितीतच हे अधिवेशन पावसाळ्यात होते. आतापर्यंत तीनवेळा हे अधिवेशन पावसाळ्यात झाले. शेवटचे अधिवेशन 1971 साली पावसाळ्यात झाले होते. त्यानंतर आता 47 वर्षांनी पावसाळ्यात अधिवेशन होत आहे.

यंदा हे अधिवेशन ऐन जुलै महिन्यात होत आहे. जुलै महिन्यात अनेकदा नागपुरातही पावसाचा जोर असतो. कित्येकदा दोनदोन दिवस पावसाची झड लागते. मुंबईतील विधानभवनात सर्वकाही एकाच छताखाली आहे. मात्र, नागपुरात तसा प्रकार नाही. विधानसभा आणि विधान परिषद यांच्या वेगवेगळ्या इमारती आहेत. याशिवाय बाजूला 8 ते 10 बराकी आहेत. या बराकींमध्ये विधिमंडळाची विविध कार्यालये थाटली जातात. विधानभवनातून बाहेर पडल्यावर या बराकीपर्यंत जायचे तर किमान 100 फूट आणि कमाल 800 फूट अंतर चालावे लागते. जर मुसळधार पाऊस सुरू झाला, तर 100 फूट अंतर चालूनही माणूस आणि त्याच्या हातातील फाईल (आता प्लास्टिक बंदी असल्यामुळे फाईल प्लास्टिकमध्ये गुंडाळून नेता येत नाही) भिजणार, हे निश्‍चित. या बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने संपूर्ण विधानभवन परिसरात ताडपत्र्यांचे आच्छादन असलेला मंडप टाकायचे ठरवले. गेल्या आठवड्यात त्या कामाने गती घेतली होती. आता मंडपाचे काम जवळजवळ पूर्णत्वाला आलेले आहे.

अधिवेशन म्हटले की, फक्त विधानभवनच तयार करणे इतक्यावर थांबत नाही. मंत्र्यांची कार्यालयेही तयार करावी लागतात. रवीभवन या शासकीय विश्रामगृहात मंत्र्यांसाठी कॉटेजीस बांधलेली आहेत. या कॉटेजच्या बाजूलाच मंडप उभारून त्यांच्या कर्मचार्‍यांना आणि अभ्यागतांना बसण्याची सोय केली आहे. पावसाळा लक्षात घेता, हे मंडपही वॉटरप्रूफ  करण्यात आले आहेत. या कॉटेजीसमध्ये मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी येऊन पोहोचले असून, ट्रक भरून फायलीही आलेल्या आहेत. या फायली व्यवस्थित लावण्याचे काम आता पूर्ण होत आलेले आहे. याचबरोबर ‘रामगिरी’ हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आणि हैदराबाद हाऊस हे त्यांचे कार्यालय हे देखील सज्ज झालेले दिसत आहे.

अधिवेशनसाठी येणारे आमदार हे आमदार निवासात थांबणे अपेक्षित असते. त्यादृष्टीने आमदार निवासात प्रत्येक आमदाराला एक सुसज्ज खोली मिळावी, अशी व्यवस्था झाली आहे. पूर्वी सर्व आमदार इथेच थांबायचे. गेल्या 15 ते 20 वर्षांत हे आमदार शहरातील विविध हॉटेल्समध्ये मुक्काम करतात. आमदार निवासात त्यांचे कार्यकर्ते मुक्कामी राहतात. आता सर्व महागड्या हॉटेलांमध्ये त्यामुळे बुकिंग फूल असल्याची माहिती आहे.

अधिवेशनासाठी येणारे उच्चपदस्थ अधिकारीही शासकीय व्यवस्थेचा उपयोग न करता अशा मोठ्या हॉटेलात राहणेच पसंत करतात. इतकेच काय पण अनेक पत्रकारही शासकीय खोल्या न वापरता अशा हॉटेलचाच आसरा घेतात. एकूणच आता या व्यवसायामध्ये सुगीचे दिवस आले आहेत.