Fri, Jan 18, 2019 09:41होमपेज › Marathwada › मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न लागणार मार्गी 

मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न लागणार मार्गी 

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 12:33AM बीड : प्रतिनिधी 

अल्पसंख्याक समाजातील मुलींना शिक्षणाची उत्तम सुविधा उपलब्ध होण्यासाठी मुलींचे वसतिगृह मंजूर आहे, परंतु बीड शहरात योग्य जागा मिळत नसल्यामुळे आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबित आहे. मुस्लिम समाजातील मौलवी व प्रतिष्ठित मुस्लिम बांधवांनी आ. विनायकराव मेटे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. या अनुषंगाने गुरुवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या दालनात मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत आ. विनायक मेटे यांनी बैठक घेतली.

 मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार शहरातील खासबाग किंवा डाक बंगला येथील उपलब्ध 2 एकर जागेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठवण्याचे ठरले. येत्या13 तारखेला बीड नगरपालिकेच्या जि.बी. मध्ये हा प्रस्ताव मांडण्यात यावा, मुस्लिम मुलींच्या वसतिगृहासाठी लागणारी जागा येत्या 15 दिवसांत निश्चित करून हा रितसर प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी बीड नगर परिषदेच्या अधिकार्‍यांना दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या वसतिगृहाच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केला आहे.

Tags : Marathwada, question, girls hostel, going, completed