Sat, Feb 23, 2019 12:47होमपेज › Marathwada › प्रस्तावित महामार्गामुळे लातूरचे अंतर कमी होणार

प्रस्तावित महामार्गामुळे लातूरचे अंतर कमी होणार

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 11 2018 12:35AMपरभणी : प्रतिनिधी

स्वातंत्र्यानंतर काही वषार्र्ंतच परभणी जिल्ह्यातून लातूरकडे जाणारा प्रस्तावित झालेला राज्य महामार्ग अद्यापही होऊ शकला नाही, मात्र हा मार्ग झाल्यास परभणी (त्रिधारा)-लातूर अंतर 48 कि.मी.ने कमी होणार आहे. आता कुठलेही शहर न ओलांडता परभणीकरांना 2.25 तासात लातूर गाठता येणार आहे. 

सदरील प्रस्तावित महामार्ग 222 राष्ट्रीय महामार्गावरील त्रिधारा येथून सुरू होऊन पिंगळी, वझूर, रावराजूर, मरडसगाव, बनवस, मालेगाव, अहमदपूरमार्गे लातूरला जातो. सध्या त्रिधारा येथून लातूरचे अंतर (एसटी महामंडळ रेकॉर्डनुसार) पाहिल्यास त्रिधारा ते परभणी 12 कि.मी. पुढे गंगाखेड 43, परळी 30, अंबाजोगाई 30 तेथून लातूर 50 कि.मी.असे एकूण 165 कि.मी आहे. या मार्गामध्ये परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई ही महत्त्वाची शहरे ओलांडण्यासाठी साधारपणे दीड तास वेळ जातो. या तुलनेत त्रिधारा येथून पिंगळी 5 कि.मी, पुढे वझूर 17, रावराजूर 2, मरडसगाव 8, बनवस 23, मालेगाव 10, अहमदपूर 12 आणि पुढे लातूर 40 कि.मी असे एकूण केवळ 117 कि.मी.अंतरच जावे लागेल.

ज्यामुळे त्रिधारा-लातूर सुमारे 48 कि.मी.अंतर कमी होणार आहे. यामुळे इंधनासोबत वेळेची बचत होणार आहे. शिवाय हा मार्ग राज्य महामार्ग म्हणून घोषित झाला तरी यावर अहमदपूर वगळता कुठलेही मोठे शहर नाही. यामुळे शहरांतर्गतची वाहतूक कोंडी सोडवत जाण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. हा रस्ता सध्या अस्तित्वात असला तरी अत्यंत अरुंद आणि खड्डेयुक्त आहे. राज्य महामार्ग झाल्यास तो रुंद होईल. शिवाय त्याची दुरुस्ती वेळोवेळी केल्या जाईल.  

या महामार्गाचा ठराव रस्त्यावरील वझूर, रावराजूर, लिमला, धनेवाडी, दगडवाडी आदी ग्रामपंचायतींनी घेतला. तो प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द केला. बांधकाम विभागानेही प्राथमिक पाहणी केली आहे.

प्रस्तावित रस्त्यावर मुख्यमंत्र्यांची दत्तक गावे

या प्रस्तावित राज्य महामार्गावरील तीन गावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीच दत्तक घेतली. यात रोकडेवाडी, मसनेरवाडी, कापसी (ता.पालम) यांचा समावेश आहे. यांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.   

गोदावरीवरील पुलाचा प्रश्‍न मार्गी ः सदर महामार्गासाठी महत्त्वाचा अडथळा गोदावरी नदी ओलांडण्याचा होता. परंतु गोदावरी नदीच्या वझूर गावाजवळील पात्रावर पूल मंजूर झाला आहे. तब्बल 17 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यानुसार प्रस्ताव डिझाईनिंगला वरिष्ठ कार्यालयात पाठवला असून ते या आठवड्यात उपलब्ध होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली आहे.