Wed, May 22, 2019 10:44होमपेज › Marathwada › तरुणाने दुग्ध व्यवसायातून साधली प्रगती

तरुणाने दुग्ध व्यवसायातून साधली प्रगती

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 20 2018 10:40PMआष्टी : सचिन रानडे

उच्च शिक्षित तरुणाने औरंगाबाद येथे असलेली नोकरी सोडून गावी परतण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर गावी शेती करून दुग्धोत्पादनही सुरू केले. आज या तरुणाकडे 50 जनावरे असून दररोज सव्वातीनशे लिटर दूध निघते. यावरच त्याने आर्थिक प्रगती साधली आहे.

शेती व्यवसायातून प्रगती साधता येत नाही, अशी सध्या नव्या पिढीची जणू धारणाच होत आहे. त्यामुळे शहराकडे चला म्हणत गावच्या विकासावर परिणाम होत आहेत, परंतु याला मात्र अपवाद ठरला तो पंकज पाटील हा युवक. ज्याने औरंगाबादसारख्या शहरात उच्च शिक्षित असल्याने मिळालेल्या नोकरीवर पाणी सोडले आणि जन्मगाव असलेल्या कडा येथेच परत येण्याचा निर्णय घेऊन वडिलोपार्जित असलेली शेतीच कसायची ठरवले.

पंकजने आपले लक्ष शेतीकडे वळविले खरे मात्र या शेती उत्पन्नाला खर्‍या अर्थाने जोड दिली ती दुग्ध व्यवसायाची, आणि यातूनच त्याने प्रगती साधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आठ-दहा म्हशी घेऊन त्याने हा व्यावसाय सुरू केला आणि आजघडीला पंकजकडे एकूण 45 म्हशी आणि 5 गायी आहेत. यातून त्याचे दैनंदिन दूध संकलन हे 325 लिटरचे आहे. यातून तो पनीर, तूपदेखील तयार करतो.एवढी मोठी जनावरे सांभाळत असताना त्याची दैनंदिनीच पहाटे तीन वाजेपासून सुरू होते. दिवसातून दोन वेळा म्हशींना स्वच्छ धुणे, त्यांची निगा राखणे, शिवाय मशीनने नाहीतर हाताने दूध काढणेच तो पसंद करतो. 

यासाठी त्याला बिहारी तरुणांची देखील साथ लाभते. 22 एकरच्या शेतात जवळपास 12 एकर शेतीवर त्याने जनावरांच्या चार्‍याची सोय केली आहे. यात प्रामुख्याने पंजाबी कडवळ, गुणवंत, दशरथ गवत आदींचा समावेश आहे. हरियाणा येथील मुर्‍हा, गुजरात येथील जाफरी अशा जातीवंत म्हशी पंकज पाटील यांच्याकडे पाहावयास मिळतात. त्यामुळे शेतीला जोड दुग्ध व्यवसायाची दिली तर शेतकरी निश्‍चित स्वयंभू बनू शकतो, असेही पंकज पाटील यांनी सांगितले.