Mon, Mar 25, 2019 13:16होमपेज › Marathwada › बीड : कारागृहाच्या १८ फूट भिंतीवरुन उडी मारुन पळून जाण्याचा कैद्याचा प्रयत्न

बीड : कारागृहाच्या १८ फूट भिंतीवरुन उडी मारुन पळून जाण्याचा कैद्याचा प्रयत्न

Published On: Mar 15 2018 7:07PM | Last Updated: Mar 16 2018 1:22AMबीड : प्रतिनिधी 

बीड येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याने १८ फुट भिंतीवरून खाली उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यात हा कैदी गंभीररित्या जखमी झाला आहे. तर त्याच्या साथीदाराने त्याची अवस्था पाहून थेट कारागृहातच जाणे पसंत केले. आज गुरूवारी बीड कारागृहात ही धक्कादायक घटना घडली. कैदी पळून जाण्याच्या या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. ज्ञानेश्वर बालाजी जाधव (३० रा.रूपचंद नगर तांडा ता.रेणापूर जि.लातूर) असे या जखमी कैद्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर बालाजी जाधव याला अंबाजोगाई येथील एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याची  बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कारागृहात असताना तो स्वयंपाकी म्हणून काम करायचा. गुरूवारी पहाटे ज्ञानेश्वर याने कारागृहातच बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या विकास देवकते याच्यासोबत कारागृहातून पळून जाण्याचा कट रचला. 

आज गुरूवारी पहाटे कारागृहात पाणी आणण्याचे काम करत असताना ज्ञानेश्वर हा साथिदार विकाससोबत १८ फुट उंची वरील भिंत वर चढून पळून जाण्याच्या प्रयत्नात  १८ फुट उंचीवरून कारागृहाबाहेर उडी मारली. यात तो जोराने जमिनीवर आदळला. यात त्याचा पाय आणि हात फ्रॅक्चर झाला.  तर असह्य वेदनेने तो बेशुद्ध पडला. आरोपी पळून गेल्याचा हा प्रकार काही वेळानंतर कारागृह प्रशासनाला लक्षात आला. कारागृह पोलिसांनी तातडीने कैद्याची शोध मोहिम सुरू केली. तर जखमी ज्ञानेश्वर हा जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी ज्ञानेश्वर यास तातडीने ताब्यात घेतले.