Fri, Jul 19, 2019 05:35होमपेज › Marathwada › मटका अड्डा छापा प्रकरणी अधिकारी घेणार झाडाझडती

मटका अड्डा छापा प्रकरणी अधिकारी घेणार झाडाझडती

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 11:11PMहिंगोली : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांना मागील सहा महिन्यांपूर्वीच जिल्ह्यातील संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याच्या सक्‍त सूचना दिल्या होत्या. काही ठाणेदारांनी वरिष्ठांचे आदेश शिरसावंध मानून अवैध धंदे बंद केले होते, परंतु आखाडा बाळापूर येथील ठाणेदाराने वरिष्ठांचे आदेश डावलून अवैध धंद्याकडे दुर्लक्ष केल्याने थेट आयजीच्या पथकाने दोन वेळेस धाडी टाकून अवैध धंद्यांचा गोरखधंदा उघड केला होता. या प्रकरणाची पोलिस अधीक्षक चावरिया यांनी गंभीर दखल घेतली आहे. वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशिद यांना बाळापुरात दोन दिवसांपूर्वी पडलेल्या मटका अड्ड्यावरील धाडीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याने खळबळ उडाली आहे.

हिंगोली पोलिस दलाच्या कारभाराविरोधात दोघा आमदारांनी काही महिन्यांपूर्वीच थेट जिल्हा कचेरीसमोर उपोषण करून अवैध धंदे बंद करण्याची आग्रही मागणी केली होती. हिंगोली पोलिस दलाच्या इतिहासात लोकप्रतिनिधींना अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी पहिल्यांदाच उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागल्याने पोलिस दलाच्या कारभाराविरोधात सामान्य जनतेतून नाराजी व्यक्‍त होत होती. आमदारांच्या उपोषणाची धसकी घेत, पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी जिल्ह्यातील तेराही ठाणेदारांना सक्‍त सूचना देऊन आपल्या हद्दीत कुठलेही अवैध धंदे चालू देऊ नये असेही सांगितले होते. वरिष्ठांच्या आदेशाची दखल घेत अनेक ठाणेदारांनी आपल्या ठाणे अंतर्गत येणार्‍या अवैध धंद्यांना आळा घातला होता, परंतु आखाडा बाळापूर परिसरात अनेक ठिकाणी लपूनछपून अवैध धंदे सुरू होते. यात प्रामुख्याने मटका व जुगाराचा समावेश होता. आखाडा बाळापूर परिसरात अवैध धंदे सुरू असल्याची कुणकुण थेट विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या कानी पडल्याने त्यांनी विशेष पथक पाठवून जुगार अड्ड्यावर काही महिन्यांपूर्वी धाड टाकली होती.

यातून धडा घेऊन बाळापूर पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे असताना पुन्हा अवैध धंदे फोफावल्याने दोन दिवसांपूर्वीच विशेष पोलिस महानिरीक्षकाच्या पथकाने बाळापुरातील जुगार अड्डयावर धाडी टाकून मुद्देमाल जप्‍त केल्याची घटना घडली होती. वरिष्ठांनी वारंवार सूचना करूनही अवैध धंदे सुरू असल्याचे या धाडीवरून स्पष्ट झाल्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक चावरिया यांनी वसमतचे एसडीपीओ शशिकिरण काशिद यांना दोन दिवसापूर्वीच बाळापुरातील मटका अड्ड्याच्या छापा प्रकरणाची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार काशिद हे आखाडा बाळापूर पोलिसांची झाडाझडती घेत आहेत. या धंद्यांना पाठीशी घालणारे नेमके अधिकारी व कर्मचारी कोण याबाबत चौकशी अहवालातून स्पष्ट होणार आहे. त्या नंतरच पुढील कारवाई होणार असली तरी सध्या चौकशीच्या भीतीनेच बाळापूर ठाण्यातील अनेक कर्मचार्‍यांची दातखिळी बसल्याचे चित्र आहे.

दोन दिवसांपूर्वी आयजीच्या पथकाने आखाडा बाळापुरातील मटका अड्ड्यावर धाड टाकून काही ऐवज जप्‍त केल्याने कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून मी वसमतचे उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद यांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून चार दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिली.

Tags : Marathwada,  officer, take, charge,  issue