होमपेज › Marathwada › खोदकामात सापडलेली मूर्ती सूर्यदेवाची

खोदकामात सापडलेली मूर्ती सूर्यदेवाची

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 10:39PMअंबासाखर : प्रतिनिधी

परळी-अंबाजोगाई महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामासाठी कन्हेरवाडी परिसरात डोंगर खोदून मुरूम भरण्याचे काम चालू होेते. यावेळी सापडलेली मूर्ती ही भगवान विष्णुची नसून 
सूर्यदेवाची असल्याचे स्पष्टीकरण औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे समन्वयक तथा इतिहास आणि पुरतत्व विभागाचे अभ्यासक मयुरेश खडके यांनी केले आहे. 

कन्हेरवाडी शिवारातील खोदकामाच्या वेळेस ही मूर्ती आणि जिवंत नाग सापडल्यानंतर विविध अफवांना पेव फुटले होते. या ठिकाणी पुरातत्व विभागाचे समन्वयक मयुरेश खडके यांना भेट देऊन अहवाल देण्याबाबतचे आदेश दिले होते. मूर्तीच्या दोन्ही हातात कमळाचे फूल असल्यामुळे ही मूर्ती सूर्यदेवाची असल्याचे त्यांनी सांगितले. विष्णुच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पदम असते. सूर्याच्या दोन्ही हातात कमळाचे फूल असते त्याप्रमाणे या मूर्तीच्या हातात ही कमळाचे फूल असल्याने ही मूर्ती सूर्यदेवाची असल्याचे सांगितले. यामूर्तीचा खालचा भाग आढळून आलेला नसल्यामुळे किंवा पुरणमंदिर वा वास्तू असल्याचे कोणतेही संकेत या ठिकाणी सकृतदर्शनी दिसत नाहीत. ही अर्धवट तुटलेली मूर्ती अनेक वर्षांपूर्वी याठिकाणी ठेवण्यात आलेली असावी आणि ती दबली गेलेली असावी एवढाच काय तो संदर्भ या घटनेशी असावा असे मयुरेश खडके यांचे मत आहर, मात्र असे असले तरी आणखीन खोदकाम होणे आवश्यक आहे, त्यानंतरच या निष्कर्षापर्यंत पोहचता येईल, असेही खडके म्हणाले. दरम्यान, पुढील खोदकाम हे पुरातत्व विभागाने त्यांच्या उपस्थितीत करावे असे मत परळीचे तहसीलदार शरद झाडके यांनी व्यक्त केले आहे.

Tags : Marathwada, idol, found, Digging, carved, image, Surya Dev